जगभरात सध्या कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. अमेरिकेमध्ये आजही मागील 24 तासांमध्ये सुमारे 2000 नागरिकांचा सलग दुसर्या दिवशी कोरोनामुळे बळी गेला. अशामध्ये आता कोरोना बळींची संख्या रोखण्यासाठी माणुसकीच्या नात्याने भारताकडून HCQ या मलेरियावरील औषधाच्या निर्यातीवरील काही बंधनं शिथिल करण्यात आली आहेत. दरम्यान अमेरिकेकडूनही या औषधाची मागणी करण्यात आली होती. काल अमेरिकेत पत्रकारांशी बोलताना U.S President Donald Trump यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. अमेरिका भारतीय आणि नरेंद्र मोदींची मदत विसरणार नाही. असं म्हणताना त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्व क्षमतेचे पुन्हा कौतुक केले आहे. कोरोना सारख्या जागतिक आरोग्य संकटामध्ये नरेंद्र मोदींचे नेतृत्त्व केवळ भारताला नव्हे तर मानव धर्माला मदत करत आहे. अशा प्रकारचं ट्वीट देखील त्यांनी केलं आहे. सोबतच मीडीयाशी बोलताना नरेंद्र मोदी 'टेरिफिक' असल्याचा त्यांनी उल्लेख केला आहे. Hydroxychloroquine म्हणजे काय? कोरोना व्हायरस ला लढा देण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प ज्या औषधाची मागणी करत आहेत त्याविषयी सविस्तर जाणून घ्या.
कोरोना रूग्णांवर उपचारासाठी आवश्यक हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन (Hydroxychloroquine) फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे सध्या जगभरातून त्याची मागणी वाढली आहे. भारतानेही त्यानुसार काही ठराविक औषधांवरील निर्यातीचे नियम शिथील करत मदतीचा हात पुढे केला आहे. काही दिवसांपूर्वी डॉनल्ड ट्रम्प यांनी भारताने आम्हांला मदत केली तर ठीक नाहीतर भविष्यात जसाच तसे उत्तर मिळेल असा निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यावेळेस भारत-अमेरिका सोबतच दोन्ही देशांच्या पंतप्रधानांचे संबंध ताणले जात आहेत की काय? अशी चर्चा रंगायला लागली होती. मात्र आता पुन्हा ट्र्म्प यांच्याकडून भारतावर स्तुतिसुमनं उधळली जात आहेत.
डॉनल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया
Extraordinary times require even closer cooperation between friends. Thank you India and the Indian people for the decision on HCQ. Will not be forgotten! Thank you Prime Minister @NarendraModi for your strong leadership in helping not just India, but humanity, in this fight!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) April 8, 2020
अमेरिकेमध्ये सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 435,128 च्या पार गेला आहे. तर कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या आता 14,795 पर्यंत पोहचली आहे. अमेरिकेमध्ये सातत्याने कोरोना बळींची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता या आजाराला नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.