अमेरिका: कोरोना व्हायसर लॉकडाऊन मध्ये घरमालाकांकडून भाडेकरुंचा लैंगिक छळ; 'Sex For Rent' करारामध्ये अडकवण्याचा प्रयत्न
Sex For Rent | Representational Image | (Photo credit: archived, edited, representative image)

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा अमेरिकेत प्रभाव अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही अमेरिकत सर्वाधिक आहे. कोरोना व्हायरसच्या या जागतिक आरोग्य संकटासोबतच एक नवी समस्या अमेरिकेत डोके वर काढू लागली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने लोकांना पैशाची कमतरता भासत आहे. न्युयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार,  कोरोनामुळे उद्भवलेल्या या परिस्थितीचा अमेरिकेतील काही घरमालक गैरफायदा घेत आहेत. घरभाडे द्यायला पैसे नसल्याने अनेक घरमालक सेक्स फॉर रेन्ट (Sex For Rent) करारामध्ये भाडेकरुंना अडकवत असल्याचे नुकत्याच आलेल्या एका अहवालातून स्पष्ट झाले आहे.

अमेरिकेतील हवाई (Hawaii) मधील स्टेट कमिशन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनच्या काळात लैंगिक छळ केल्याप्रकरणी घरमालकांविरुद्ध 10 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. गेल्या दोन वर्षातील लैंगिक छळ्याच्या तक्रारींपेक्षा गेल्या 2 महिन्यांत अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. त्यामुळे बहुतांश लोकांचे उत्पन्न बंद आहे. परिणामी भाडे भरणे शक्य होत नसल्याने अशा भाडेकरुंना घरमालक लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडत आहेत. घरमालकांकडून भाडेकरुंचा लैंगिक छळ होणे ही नवीन बाब नाही. मात्र लॉकडाऊन दरम्यान या घटनांचे प्रमाण अधिक वाढले आहेत.

घरमालकांच्या या मागण्या पूर्ण न करता टेन्टट ऑरगनायझेशनकडे (Tenants Organization) तक्रार दाखल करावी अशा सूचना स्टेट कमिशन अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत. तसंच तुम्हाला तुमचे अधिकार जाणून घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. न्यायलये सध्या लहान-मोठ्या तक्रारींसाठी बंद असली तरी भाडेकरु असुरक्षित आहेत असं नाहीत, असा दिलासा त्यांनी भाडेकरुंना दिला आहे.