Bangalore (Photo Credit : Wikimedia Commons)

तुम्ही जर भारतातील सिलिकॉन व्हॅली समजल्या जाणाऱ्या बेंगळुरू (Bengaluru) येथे फ्लॅट किंवा घर शोधत असाल, जर तुम्हाला या ठिकाणी जागा भाड्याने घ्यायची असेल, तर तुमच्याकडे आयआयटी (IIT) ची पदवी असणे आवश्यक ठरू शकते. अन्यथा घरमालक तुम्हाला घर देण्यास तयार होणार नाहीत. बेंगळुरूमधील घरमालकांनी भाडेकरूंकडून असलेल्या त्यांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. त्यामुळे आता तुम्ही आयआयटी ग्रॅज्युएट नसाल, तर बेंगळुरू येथे भाड्याने घर शोधणे एक आव्हान ठरू शकते.

बेंगळुरूमधील घरमालक भाडेकरूंनी आयआयटीमधून शिक्षण घेतले आहे की नाही या आधारावर त्यांना घरे देण्यास नकार देत आहेत. घरमालक घरे देण्याआधी लिंकडीन (LinkedIn) प्रोफाइल आणि पदवी घेतलेल्या महाविद्यालयांची मागणी करत आहेत. एका घरमालकाने अशाच एका व्यक्तीला घर देण्यास नकार दिल्याचा प्रिंट शॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बेंगळुरूमध्ये भाड्याने फ्लॅट शोधत असलेल्या एका व्यक्तीला घरमालकाने घर नाकारले कारण तो आयआयटी, आयआयएम किंवा या स्तरावरील इतर कोणत्याही महाविद्यालयाचा पदवीधर नाही. त्याचा घरमालकाच्या एजंटशी झालेला संवाद सोशल मिडियावर चर्चेत आहे. प्रियांश जैन या ट्विटर वापरकर्त्याने एका एजंटशी झालेले चॅट शेअर केले आहे.

प्रियांश जैन इंदिरानगर, डोमलूर किंवा एचएएल परिसरात सिंगल ऑक्युपन्सी फ्लॅट शोधत होता. त्याला वाटले की, घरमालक त्याला त्याचा धर्म, तो शाकाहारी आहे की मांसाहारी, त्याचे लग्न झाले आहे का, अशा गोष्टी विचारेल. परंतु एजंटने प्रियांशला त्याची लिंक्डइन प्रोफाइल मागितली. ही मागणी ऐकून प्रियांशला धक्का बसला, मात्र पुढे तो IIT/IIM पदवीधर नसल्यामुळे त्याला घर देण्यास नाकारले. (हेही वाचा: अडीच वर्षाच्या मुलीला लागली होती भूक, वडिलांकडे मागितले जेवण, पैसे नसल्याने चिमुरडीची हत्या)

चॅटमध्ये एजंट प्रियांशची पार्श्वभूमी, कॉलेज आणि कामाच्या ठिकाणाबद्दल विचारतो. जैन स्पष्ट करतो की, तो अटलासियन येथे काम करतो आणि शाकाहारी आहे. तो व्हीआयटी वेल्लोरमधून पदवीधर आहे. व्हीआयटी वेल्लोर हे कॉलेज ऐकल्यावर एजंट त्याला स्पष्टपणे नकार देतो. एजंटने जैनला सांगितले की, घरमालक फक्त IIT, IIM, CA ISB पदवीधर भाडेकरूच्या शोधात आहे.