UNSC Elections 2020: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताची 2021-22 साठी तात्पुरत्या सदस्यपदी निवड
UNSC (Photo Credits: Wikimedia Commons)

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये (United Nations Security Council) भारताची (India) पुन्हा Asia-Pacific Category मधून तात्पुरत्या सदस्यपदी निवड करण्यात आली.  2021-22 या वर्षभरासाठी ही निवड आहे. दरम्यान भारतासोबतच आयर्लंड, मॅक्सिको आणि नॉर्वे या देशांचीही सुरक्षा परिषदेमध्ये निवड झाली आहे. भारताला 192 पैकी 184 मतं मिळाली असून भारत 8 व्यांदा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेमध्ये तात्पुरता सदस्य देश बनला आहे. दरम्यान कोरोना व्हायरस जागतिक आरोग्य संकटामध्येही पुरेशी खबरदारी घेत अमेरिकेमध्ये संयुक्त राष्ट्राची 75 वी महासभा पार पडली.

भारताचे संयुक्त राष्ट्रामधील प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी देखील भारताच्या विजयानंतर आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान भारत नेतृत्त्व कायम ठेवत नव्या दिशेने काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच याप्रसंगी त्यांनी समर्थक देशांचे, सदस्यांचेही आभार मानले आहेत. तर भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांचं नेतृत्त्व आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनचे हे यश आहे. कोव्हिड 19 च्या काळात त्यांच्या भक्कम नेतृत्त्वामुळे हा विजय सुकर झाल्याची भावना त्यांनी एका व्हिडिओ मेसेजद्वारा शेअर केली आहे.

ANI Tweet

भारत देश यापूर्वी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये  तात्पुरत्या सदस्यपदी   1950-1951, 1967-1968, 1972-1973, 1977-1978, 1984-1985, 1991-1992 आणि 2011-12 साली होता.

फ्रांस, ब्रिटन, अमेरिका, रशिया, चीन हे पाच देश संयुक्त राष्ट्रामध्ये कायमस्वरूपी सदस्य देश आहेत. इतर 10 सदस्य देशांना दोन-दोन वर्षासाठी निवड प्रक्रियेचा सामना करावा लागतो. दरम्यान कॅनडा देशाला अवघी काही मत कमी पडल्याने ते विजयापासून दूर राहिले आहेत.