सध्या कोरोना विषाणूशी (Coronavirus) संपूर्ण जग लढत आहे, अशात अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली होती. आता ब्रिटन (England) मध्ये ही परिस्थिती उद्भवली आहे. युनायटेड किंगडममधील कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेदरम्यान पंतप्रधान बोरिस जॉनसन (PM Boris Johnson) यांनी मंगळवारी नव्याने निर्बंध जाहीर केले. हाऊस ऑफ कॉमन्सला (House of Commons) संबोधित करताना, बोरिस जॉनसन यांनी कोरोनाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर खासदारांना कोरोनाच्या उपायांविषयी माहिती दिली. तसेच येत्या सहा महिन्यांसाठी देशात नवीन निर्बंध लागू असतील असे सांगितले.
पंतप्रधान म्हणाले की, रूग्णालयात रूग्णांची संख्या वाढत आहे आणि दररोज वाढणारी प्रकरणे आटोक्यात आणली तर काही जीव वाचू शकतील. जॉनसन यांनी जाहीर केलेल्या ताज्या निर्बंधानुसार, पब्ज आणि रेस्टॉरंट्स, हॉटेलमधील टेबल-सर्व्हिस रात्री 10 वाजेपर्यंत बंद केल्या जातील. ज्या लोकांना घरातून काम करणे शक्य आहे त्यांनी घरातूनच काम करावे व ज्यांना अगदीच शक्य नाही त्यांनी कार्यालयात जावे, असा सल्ला युके सरकारने दिला आहे.
यावेळी जॉनसन म्हणाले, 'जर या नवीन उपायांनी कोरोना व्हायरस दुप्पट होण्याचा दर (Reproduction Rate) 1 च्या खाली आणला नाही तर पुढील निर्बंधांची आवश्यकता असेल.' सध्या यूके कोरोना व्हायरस साथीच्या दुसर्या लाटेकडे वाटचाल करत आहे. लंडनमध्ये 100,000 लोकांमागील संसर्ग हा गेल्या सात दिवसांमध्ये 18.8 वरून 25 वर गेला आहे. (हेही वाचा: Coronavirus विरुद्ध लढण्यासाठी 'सुरक्षा कवच' बनू शकतो Dengue; रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी होत आहे मदत, अभ्यासातून खुलासा)
उल्लेखनीय म्हणजे, यूकेमधील काही भाग आधीपासून स्थानिक लॉकडाऊन अंतर्गत आहेत. सेल्फ आयसोलेशन किंवा लॉक डाऊन नियमांचा भंग करणाऱ्या लोकांवर 28 सप्टेंबरपासून भारी दंड आकारला जाणार आहे. यूकेमध्ये आतापर्यंत, जवळजवळ 400,000 लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे, तर या प्राणघातक विषाणूने 41,000 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. ब्रिटनमधील कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे दररोज कमीत कमी 6000 ने वाढत आहेत. याशिवाय रुग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांची संख्या दर आठ दिवसांनी दुप्पट होत आहे.