जगभरातील अतिशय धोकादायक असलेल्या 21 देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश झाला आहे. या समावेशामुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा दणका बसला आहे. युके (UK) सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दहशदवादाला मदत, प्रोत्साहन आणि कोरोना काळात अत्यंत गलथानपणे राबवलेली व्यवस्था आदी कारणांमुळे युनायटेड किंग्डम सरकारने (UK Government)हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. युनायटेड किंग्डम सरकारच्या ( United Kingdom Government) फायनान्शीअल टास्क फोर्सने (Financial Action Task Force) जाहीर केलेल्या 21 देशांच्या यादीमध्ये पाकिस्तान 15 व्या क्रमांकावर आहे. तर सीरिया, युगांडा, येमेन आणि झिम्बाब्वे हे पहिल्या काही देशांमध्ये आहेत.
युके सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या देशांची कर नियंत्रणाबाबतची कमकुवत धोरणे, आर्थिक व्यवस्थापनातील अनागोंदी त्यामुळे दहशतवादाला मिळणारे उत्तेजन पाहता या देशांचा समावेश धोकादायक देशांमध्ये करण्यात आला आहे. (हेही वाचा, Saudi Arabia: सौदी अरेबियाने पाकिस्तानसह चार देशांतील महिलांशी लग्न करण्यास लावली रोख; बनवले नवीन कडक नियम)
युके सरकारने मनी लाँडरिंग अँण्ड टेररिस्ट फायनान्सिंग (दुरुस्ती) (उच्च-जोखीम देश) नियमन 2021 देशात 26 मार्च 2021 पासून लागू केला आहे. त्यामुळे दहशतवाद आणि आर्थिक गुन्हे आदींबाबत देशात अधिक खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान, पाकिस्तानने मात्र आपल्यावर झालेल्या कारवाईचा निषेध केला आहे. ही केवळ एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकीय खेळी असल्याचे म्हटले आहे. आपल्यावरील कारवाईमुळे पाकिस्तानला आर्थिक कृती दलाच्या (FATF) करड्या यादीतून (Pakistan In Grey List) बाहेर पडणे कठीण होऊन जाईल असे म्हटले आहे.