Foetal Repair शस्त्रक्रियेची किमया; लंडनमध्ये गर्भातच दुरुस्त केला बाळाच्या पाठीच्या कण्यातील दोष
Representational Image | (Photo credits: PTI)

गर्भात असलेल्या बाळाच्या पाठकण्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. युकेमध्ये बेथन सिम्पसन (Bethan Simpson)  या 26 वर्षीय गर्भवती महिलेवर फीटल रिपेअर (foetal repair) ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 20 आठवड्यांच्या स्कॅननंतर गर्भातील बाळाला 'स्पायना बिफिडा' (Spina Bifida) नावाचा आजार असल्याचे निदान झाले. ज्यामध्ये बाळाच्या पाठकण्याची वाढ योग्यरित्या होत नाही. हा एक प्रकारचा जन्मदोष आहे. त्यामुळे गर्भावस्थेच्या 24 व्या आठवड्यात महिलेवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. (धक्कादायक: नॉर्मल डिलेव्हरीसाठी आलेल्या महिलेच्या पोटावर इतका दिला दाब की आतडे आणि गर्भाशयही आले बाहेर, गर्भवतीचा मृत्यू)

'फीटल रिपेअर' (foetal repair) ही शस्त्रक्रिया सुमारे चार तास सुरु होती. यात गर्भ उघडण्यात आला. त्यानंतर बाळाची जागा बदलण्यात आली. मग होल गॅप शिवून भरण्यात आली आणि पाठीचा कणा सुस्थितीत ठेवला.

'फीटल रिपेअर' ही शस्त्रक्रिया जोखमीची असल्याने बेथन सिम्पसनला गर्भपाताचा सल्ला देण्यात आला होता. मात्र तिने त्यास स्पष्ट नकार दिला. "गर्भातील बाळाची हालचाल जाणवत होती, त्याच्याशी बॉन्डिग झाल्याने गर्भपाताचा विचारही ती करु शकत नाही," असे तिने सांगितले.

Spina Bifida काय आहे?

स्पायना बिफिडा हा एक जन्मदोष असून यात गर्भातील बाळाचा स्पाईन आणि स्पायनल कॉर्डची वाढ नीट होत नाही. यामुळे स्पाईनच्या हाडांमध्ये गॅप राहतो.

Spina Bifida होण्याची कारणे:

डॉक्टरांच्या मते, या जन्मदोषामागच्या ठोस कारणांचा शोध लागलेला नाही. मात्र गर्भारपणाच्या सुरुवातीला फॉलिक अॅसिडची कमतरता असल्यास बाळात हा दोष उद्भवू शकतो. तसंच गर्भवती महिलेने अनेक औषधांचे सेवन केल्यास किंवा कुटुंबात कोणाला हा आजार असल्यास बाळाला होण्याची शक्यता असते.