प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

संयुक्त अरब अमीरात (UAE) मध्ये, युरोपच्या एका महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बल 50,000 डॉलर्सची फसवणूक केली आहे. विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आपण स्वतःला घटस्फोटीत असल्याचे सांगून, आपल्या मुलांसाठी ती लोकांकडे पैसे मागत असे. दुबई पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरद्वारे अनेकांची फसवणूक करत फक्त 17 दिवसांत या महिलेने इतके पैसे कमावले आहेत. या महिलेचे नाव आणि तिच्या वयाचा उल्लेख पोलिसांनी केला नाही.

दुबई पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभागाचे निर्देशक ब्रिगेडियर जमाल अल सलेम अल जल्लाफ यांनी या घटनेची माहिती दिली आहे. या महिलने विविध सोशल मिडियावर आपले खाते उघडले होते. या खात्यांवर तिने आपल्या मुलांचे फोटो टाकले होते आणि ‘मुलांच्या पालन पोषणासाठी मदत हवी असल्याचे’ लिहिले होते. अनेक लोक भावनिक होऊन तिला मदत करायला पुढे सरसावले. या लोकांना तिने ती घटस्फोटीत आणि व ती एकटी मुलांचा सांभाळ करत असल्याचे सांगितले. अशा प्रकारे खोटे बोलून तिने 17 दिवसांत तब्बल 35 लाख रुपये कमावले. (हेही वाचा: Paytm मध्ये कॅशबॅकच्या नावाखाली 10 कोटी रुपयांचा घोटाळा; कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच केली फसवणूक)

या महिलेच्या पूर्व पतीला अनेक मित्र आणि नातेवाईकांनी फोन करून, त्याच्या मुलांचा फोटो भिक मागण्यासाठी वापरला जात असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने स्वतः खातरजमा करून   पोलिसांना या गोष्टीची माहिती दिली. ही महिला खोटे बोलत असून मुलांचा सांभाळ आपण स्वतः करत असल्याचे त्याने सिद्ध केले. त्यानंतर दुबई पोलिसांनी या महिलेला अटक केली, व लोकांना आवाहन केले की त्यांनी सोशल मिडियावर अथवा रस्त्यावर भिक मागणाऱ्या लोकांना मदत करू नये.