Paytm (Photo Credits: ANI)

नोटबंदीनंतर जेव्हा प्लास्टिक मनी, डिजिटल व्यवहार यांवर भर देण्यात आला, त्यावेळी पैशांचे ऑनलाईन व्यवहार करणारे अनेक अॅप्स, वेबसाईट यांचा भाव वधारला. त्यात पेटीएमची (Paytm) लोकप्रियता रातोरात शिगेला पोहचली. ऑनलाईन व्यवहारांसोबत कॅशबॅकच्या (Cashback) ऑफरमुळे आजही पेटीएमचे स्थान बळकट आहे. मात्र याचबाबतीत पेटीएममध्ये मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. कंपनीमध्ये कॅशबॅकच्या नावाखाली कमीतकमी 10 कोटी  रुपयांची फसवणूक झाली आहे. कंपनीचे प्रमुख विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांनी याबाबत माहिती दिली.

पेटीएमसारखे प्लॅटफॉर्म, व्यवहार प्रक्रियेसाठी मिळणारी व्यापारी सवलत तसेच, चित्रपट तिकीट विक्रीसारख्या व्यवहारात 15% पर्यंत मिळणारा फायदा यातून कमाई करतात. दिवाळीनंतर, यामध्ये काही लहान विक्रेत्यांना जास्त कॅशबॅक मिळत असल्याचे कंपनीच्या टीमच्या लक्षात आले. याबाबतीत संशय बळावल्याने कंपनीकडून तपशीलात लेखापरीक्षण (Audit) करण्यात आले. यातून समोर आलेली माहिती धक्कादायक होती. कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी कॅशबॅकच्या नावावर ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम विक्रेत्यांना वाटल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार गेले कित्येक महिने चालू होता. यामध्ये कंपनीची 10 कोटी पेक्षा जास्त फसवणूक झाल्याचे लक्षात आहे. (हेही वाचा: Paytm कडून लवकरच नवी सेवा सुरु; उपलब्ध होणार घरी बसून पैसे कमावण्याची संधी)

याबाबत कठोर कारवाई करत, कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. तसेच यामध्ये सामील असलेल्या विक्रेत्यांशी कंपनीने नाते तोडून, आता फक्त ब्रॅन्डेड विक्रेत्यांनाच कंपनीमध्ये सामील करून घेतले जाणार आहे. असाच प्रकार अलीबाबा कंपनीतही घडला होता, जिथे कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी थर्ड पार्टी विक्रेत्यांसह स्वतंत्रपणे काम करून, कॅशबॅक ऑफर मिळवण्यासाठी बनावट ऑर्डरी तयार केल्याचे समोर आले होते.