Turkey-Syria Earthquake: तुर्की आणि सीरियामधील भूकंपामध्ये आतापर्यंत 5000 हून अधिक लोकांचा मृत्यू; मृतांची संख्या आठ पट वाढण्याचा WHO चा दावा
Buildings Collapsing Like Pancakes. (Photo Credits: Twitter)

तुर्की, सीरिया, इस्रायल आणि लेबनॉनला (Turkey-Syria Earthquake) सोमवारी दशकातील सर्वात भयंकर भूकंपाचा सामना करावा लागला. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये रविवारी रात्री साधारण 7.8 रिश्टर स्केलचा पहिला भूकंप झाला. त्यानंतर सोमवारी अशाच रिश्टर स्केलचे आणखी दोन भूकंप झाले आणि सर्वत्र हाहाकार माजला. त्यानंतर आजही प्रदेशात चौथ्या भूकंपाचे धक्के जाणवले. अशाप्रकारे इथे 24 तासांत 4 भूकंप झाले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुर्की आणि सीरियामध्ये आतापर्यंत 5 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 20 हजारांहून अधिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अशात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मोठा दावा केला आहे. मृत्यूचा हा आकडा आठ पटीने वाढू शकतो, असे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे. जखमींची संख्याही झपाट्याने वाढणार आहे.

तुर्कस्तान आणि सीरिया एवढ्या विनाशकारी भूकंपाचे बळी का ठरले हे कोणालाच समजत नाही. शास्त्रज्ञांच्या मते, दोन देशांमधील अनाटोलियन आणि अरेबियन प्लेट्समध्ये 100 किमी (62 मैल) पेक्षा जास्त अंतर तुटले आहे. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, 'भूकंपाच्या घटनांमध्ये आपण अनेकदा पाहिले आहे की मृत आणि जखमींची संख्या कालांतराने वेगाने वाढते. तसेच इथेही होणार आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये इथल्या भुकंपामुळे मृत्यूंची संख्या अजून 8 पट वाढणार आहे.’

भूकंपामुळे बेघर झालेल्या लोकांसाठी आरोग्य संघटनेने इशाराही जारी केला. थंडीमुळे अशा लोकांच्या अडचणी आणखी वाढू शकतात, असे सांगितले आहे. इथल्या भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरियासह चार देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत. तुर्कस्तानमध्ये 10 शहरे बेचिराख झाली आहेत. शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असून अनेक बेपत्ता आहेत. तुर्कीमध्ये सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुर्की आणि सीरियामध्ये किमान 5000 लोक मारले गेले आहेत आणि 10 शहरांमधील 1,700 हून अधिक इमारतींचे नुकसान झाले. भारताने भूकंपग्रस्त तुर्कस्तानला भूकंप मदत सामग्रीची पहिली खेप पाठवली आहे. पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या घोषणेनंतर काही तासांनंतर, भारताने भारतीय हवाई दलाच्या विमानाने भूकंप मदत सामग्रीची पहिली खेप तुर्कीला पाठवली आहे. (हेही वाचा: तुर्कस्तानच्या भूकंपामध्ये 2,200 वर्षांहून अधिक जुना गझियानटेप किल्ला ध्वस्त, राहिले फक्त अवशेष)

माहितीनुसार, प्रशिक्षित श्वान पथक आणि आवश्यक उपकरणांसह प्रत्येकी 100 सदस्यांच्या दोन एनडीआरएफ टीम भूकंपग्रस्त भागात शोध आणि बचाव कार्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. यासोबतच आवश्यक औषधांसह प्रशिक्षित डॉक्टर आणि पॅरामेडिकचे पथकही रवाना करण्यात आले आहे.