तुर्कस्तान आणि सीरियामधील भुकंपामुळे (Turkey and Syria Earthquake) इथे मोठा विध्वंस झाला आहे. या विनाशकारी भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत, तर मृतांचा आकडा 16000 च्या वर गेला आहे व 50 हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. सर्वत्र हाहाकार माजला असून, लाखो लोग बचावकार्यात गुंतले आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंप इतका मोठा होता की, ज्यामुळे जमीन 10 फुट खाली दबली आहे.
इटलीचे भूकंपशास्त्रज्ञ डॉ कार्लो डोग्लिओनी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, तुर्कीच्या टेक्टोनिक प्लेट्स सीरियाच्या तुलनेत 5 ते 6 मीटरने दबल्या जाऊ शकतात. त्यांनी पुढे स्पष्ट केले की तुर्की प्रत्यक्षात अनेक मुख्य फॉल्टलाइनवर स्थित आहे. हे अॅनाटोलियन प्लेट, अरेबियन प्लेट आणि युरेशियन प्लेट यांनी जोडलेले आहे. त्यामुळेच येथे भूकंपाचा धोका सर्वाधिक आहे. तेथील हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, अॅनाटोलियन प्लेट आणि अरेबियन प्लेटमधील 225 किलोमीटरची फॉल्टलाइन तुटली आहे.
भूकंपाच्या अनेक मोठ्या धक्क्यांमुळे तुर्कीये आणि सीरियामध्ये रस्ते, इमारतींसह अनेक महामार्ग कोसळले आहेत. रस्त्यांवरही मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत. अनेक बहुमजली इमारती कोसळल्यामुळे सध्या तरी मृतांचा आकडा 16000 च्या पुढे गेला आहे, मात्र तो अजून 8 पट वाढू शकतो असे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे. अधिकारी आणि डॉक्टरांच्या मते, एकट्या तुर्कीमध्ये 12,873 आणि सीरियामध्ये 3,162 लोकांचा मृत्यू झाला आहे.
6 फेब्रुवारी रोजी, स्थानिक वेळेनुसार पहाटे 4.17 वाजता, दक्षिण तुर्कस्तानमधील गॅझियानटेप शहराजवळ पहिला 7.8 तीव्रतेचा भूकंप झाला. सीरिया, लेबनॉन, सायप्रस आणि इराक प्रांतात त्याचे धक्के जाणवले. त्यानंतर 24 तासांत 4 मोठे भूकंप झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी सुरुवातीच्या भूकंपाचे 120 पेक्षा जास्त आफ्टरशॉक नोंदवले आहेत. (हेही वाचा: तुर्कस्तान येथील भुकंपानंतर भारताने पाठवली मदत व निधी; राजदूत Fırat Sunel यांनी मानले आपल्या ‘दोस्त’ देशाचे आभार (Watch Video)
दरम्यान, 9 फेब्रुवारी रोजी, संयुक्त राष्ट्र प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी शोक व्यक्त करण्यासाठी न्यूयॉर्कमधील तुर्की मिशनला भेट दिली आणि भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी जागतिक समुदायाला आवाहन केले. तुर्किये देखील सामान्य स्थिती पुनर्संचयित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदतीची विनंती करू शकतो.