तुर्कस्तान (Turkey) व सिरीया (Syria) येथे भूकंपाने (Earthquake) हाहाकार माजवला आहे. गेल्या 24 तासांत इथे 4 भूकंप झाले असून, या नैसर्गिक आपत्तीमध्ये हजारो इमारती जमीनदोस्त झाल्या असून, आतापर्यंत 5000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर भारताने तुर्कस्तानला मदतीचा हात पुढे केला आहे. भारताकडून मदत पथक तुर्कस्तानला पोहोचले आहे.
आता भारतातील राजदूत फिरात सुनेल (Fırat Sunel) यांनी रविवारी व सोमवारी आपल्या देशात भूकंपाचे जोरदार धक्के बसल्यानंतर काही तासांतच भारताने दिलेल्या मदतीचे कौतुक केले आहे. ज्या देशांनी तुर्कस्तानला मदत आणि बचाव पथके पाठवली त्यापैकी भारत एक असल्याचे सुनेल यांनी म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या भूकंपानंतर, भारताच्या पंतप्रधानांच्या सूचनेनुसार एनडीआरएफने समन्वय बैठक बोलावली व त्यानुसार तुर्कस्तानला मदत धाडली.
गेल्या 24 तासांत 4 हून अधिक भूकंपांनी मध्यपूर्वेतील तुर्कस्तान-सीरियामध्ये विध्वंस घडवून आणला आहे. रविवारी व सोमवारी झालेल्या भूकंपामुळे दोन्ही देशांतील उभ्या असलेल्या अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. अशा परिस्थितीत भारताने तुर्कस्तानला सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आहे. आपत्तीनंतर लगेचच पंतप्रधान मोदींनी आपल्या राज्य परराष्ट्रमंत्र्यांसोबत दिल्लीतील तुर्की दूतावासात आपला शोक संदेश पाठवला. राज्य परराष्ट्र मंत्री व्ही मुरलीधरन यांनी तुर्कीचे भारतातील राजदूत फिरात सुनेल यांची भेट घेऊन शोक व्यक्त केला आणि सर्व प्रकारच्या मानवतावादी मदतीचे आश्वासनही दिले. (हेही वाचा: तुर्की आणि सीरियामधील भूकंपामध्ये आतापर्यंत 5000 हून अधिक लोकांचा मृत्यू; मृतांची संख्या आठ पट वाढण्याचा WHO चा दावा)
"Dost" is a common word in Turkish and Hindi... We have a Turkish proverb: "Dost kara günde belli olur" (a friend in need is a friend indeed).
Thank you very much 🇮🇳@narendramodi @PMOIndia @DrSJaishankar @MEAIndia @MOS_MEA #earthquaketurkey https://t.co/nB97RubRJU
— Fırat Sunel फिरात सुनेल فرات صونال (@firatsunel) February 6, 2023
भारताच्या परराष्ट्र राज्यमंत्र्यांच्या या भेटीनंतर फिरात सुनेल यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले की, ‘तुर्की आणि हिंदीमध्ये ‘मित्र’ हा मैत्रीसाठी वापरला जाणारा सामान शब्द आहे. तुर्कस्तानमध्ये एक म्हण आहे की, जो मित्र गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र असतो.’ फिरात सुनेल यांचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांनी भारताच्या मदतीबाबत आभार मानले आहेत. दरम्यान, भारताकडून 50 हून अधिक एनडीआरएफ शोध आणि बचाव कर्मचारी पथके, विशेष प्रशिक्षित श्वान पथके, ड्रिलिंग मशीन, मदत सामग्री, औषधे आणि इतर आवश्यक उपकरणांसह पहिले भारतीय C17 फ्लाइट भूकंपग्रस्त तुर्किये येथे पोहोचले आहे.