कोरोना विषाणू (Coronavirus) महामारी सुरु झाल्यापासूनच जपानमध्ये (Japan) संसर्गाचे प्रमाण नियंत्रित होते. सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे लोकांना महामारीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला नाही. आता कोरोनाचा संसर्ग अजूनही असताना जपानची राजधानी टोकियो (Tokyo) येथे ऑलम्पिक स्पर्धा (Olympics 2020) सुरु आहेत. ऑलिम्पिक खेळ सुरू झाल्यानंतर मंगळवारी जपानच्या राजधानीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची फार मोठ्या प्रमाणावर नोंद झाली आहे. मंगळवारी टोकियोमध्ये कोविड-19 संसर्गाची 2,848 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. महामारी सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या जास्त प्रमाणात रुग्ण आढळले आहेत.
गतवर्षी कोरोना साथीचा रोग सुरू झाल्यापासून टोकियोमधील कोविड-19 संक्रमणाची एकूण संख्या दोन लाखांवर गेली आहे. या साथीला सामोरे जाण्यासाठी चौथ्यांदा टोकियोमध्ये आपत्कालीन स्थिती लागू करण्यात आली आहे. पुढील महिन्यात ऑलिम्पिक आणि पॅरालंपिक खेळ होईपर्यंत हे सुरू राहील. शुक्रवारी ऑलिम्पिक स्पर्धेस प्रारंभ झाला आणि त्यानंतर लागेचच देशात डेल्टा व्हेरिएंटने शिरकाव केल्यामुळे संसर्गाच्या घटना वाढत असल्याची शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. यापूर्वी 7 जानेवारी रोजी सर्वाधिक 2,520 प्रकरणे नोंदवली गेली होती.
संसर्गाच्या इतक्या मोठ्या प्रमाणातील घटना अशावेळी समोर आल्या जेव्हा, टोकियो ऑलिम्पिक सुरू झाले आहे आणि जगातील सर्वोत्तम खेळाडू टोकियोमध्ये उपस्थित आहेत. यामुळेच संयोजकांच्या चिंता वाढल्या आहेत. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, टोकियो ऑलिम्पिकशी संबंधित सात नवीन कोरोना प्रकरणे मंगळवारी नोंदली गेली आहेत. त्यातील चार एथलीट होते आणि त्यातील दोघे शहरातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणार्या शहराबाहेरील ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये राहिले होते.
(हेही वाचा: Indonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...)
ऑलिम्पिक खेळ रद्द व्हावेत या मागणीसाठी टोकियोमध्ये मोठ्या प्रमाणात निषेध नोंदविण्यात आले आहेत. या खेळामुळे देशांतील संसर्ग वाढू शकतो अशी भीती आहे. अहवालानुसार, डेल्टा व्हेरिएंटमुळे टोकियोच्या रूग्णालयात संसर्गाची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत.