Apple Smartwatch | (Photo Credits: apple.com)

अमेरिकेतील वॉशिंग्टन (Washington) राज्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी पतीने आपल्या पत्नीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला. मात्र दैव बलवत्तर होते म्हणून अगदी शेवटच्या क्षणी या महिलेचा जीव मोठ्या मुश्किलीने वाचला. आता या पतीवर खुनाचा खटला चालवला जाईल. महत्वाचे म्हणजे, ऍपल वॉचच्या (Apple Watch) मदतीने या महिलेचा जीव वाचला आहे. घडल्या प्रकारामध्ये महिलेला गंभीर दुखापत झाली असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अमेरिकन न्यूज चॅनल एनबीसीने दिलेल्या माहितीनुसार, यंग नावाच्या या महिलेच्या पतीने चाय क्योंगने एका मोठ्या भांडणानंतर तिचे घरातून अपहरण केले आणि तिला जंगलात नेले. यावेळी तिच्यावर चाकूने हल्लाही करण्यात आला. त्याचवेळी यंगला तिच्या ऍपल वॉचवरून 911 वर कॉल करण्यात आणि तिच्या आपत्कालीन संपर्कांना नोटिफिकेशन पाठवण्यात यश आले.

इकडे चाय क्योंगने यंगला ड्रग्ज देऊन, तिच्या चेहऱ्यावर टेप लावून खड्ड्यात जिवंत पुरले आणि तिच्यावर एक जड झाड ठेवले. जमिनीत गाडल्यानंतर नवरा वरून माती टाकत असल्याचे यंगला जाणवत होते. यंगने सांगितले की, ती अनेक तास तशीच खड्ड्यात पडून होती. शेवटी ती टेप कापण्यात यशस्वी झाली. त्यानंतर खड्ड्यातून बाहेर येण्यासाठी तिला वेगळा संघर्ष करावा लागला.

तिथून बाहेर पडल्यानंतर ती साधारण 30 मिनिटे मदत मिळवण्यासाठी धावत राहिली. अखेर रात्री 1 च्या सुमारास तिला मदत मिळाली. पोलिसांनी यंगच्या 911 वरील कॉलनंतर तिचा तपास सुरु केला होता. ते जेव्हा तिच्या घरी पोहोचले तेव्हा तिच्या गॅरेजचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनतर तिचा सर्वत्र शोध सुरु झाला. यंगने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, तिच्या पतीने यापूर्वीही तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. (हेही वाचा: Crime: कर्मचाऱ्यांने चिकन बिर्याणी देण्यास दिला नकार, मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तीने रेस्टॉरंटला लावली आग)

अहवालानुसार, चाय क्योंगवर फर्स्ट-डिग्री हत्येचा प्रयत्न, फर्स्ट-डिग्री अपहरण आणि फर्स्ट-डिग्री प्राणघातक हल्ल्याचा आरोप आहे. त्याच्यावरील हे आरोप अद्याप अधिकृतपणे सिद्ध झाले नाहीत. यंग आणि चाय क्योंग यांच्यामध्ये निवृत्तीनंतरच्या पैशांवरून भांडणे सुरु होती.