Cemetery (Photo Credits: Getty Images|Representational Image)

पोलंडमधून (Poland) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका मुलाने 13 वर्षे आपल्या आईचा मृतदेह घरातील सोफ्यावर ठेवला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर या व्यक्तीला अटक करून तुरुंगात टाकले आहे. मारियन एल असे या व्यक्तीचे नाव आहे. या मुलाने आपल्या आईचा मृतदेह कबरीतून बाहेर काढून तिची मम्मी (Mummified Body) बनवून घरातील सोफ्यावर जतन करून ठेवला होता. ही घटना दक्षिण-पश्चिम पोलंडमधील रॅडलिन या छोट्या शहरातील आहे. अनेक वर्षानंतर जेव्हा एक वृद्ध नातेवाईक या मुलाच्या घरी पोहोचला तेव्हा ही घटना उघडकीस आली.

जेव्हा हे नातेवाईक घरी पोहोचले तेव्हा त्यांना दिसले की, मम्मी सोफ्यावर पडली होती आणि त्यावर वर्तमानपत्रांचा थर होता. ही वृत्तपत्रे 2009 सालापासूनची होती. 2010 मध्ये महिलेचा मृत्यू झाला होता. त्यांनी ताबडतोब पोलिसांना याची माहिती दिली. पोलीसही लगेच घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात आली व त्यावरून ती जडगीवाची असल्याचे स्पष्ट झाले. जानेवारी 2010 मध्ये तिचा मृत्यू झाला, जी मारियनची आई होती.

या तपासणीनंतर हेही समोर आले की, 16 जानेवारी 2010 रोजी ज्या कबरीत जाडगीवाला दफन करण्यात आले होते, ती कबर आता रिकामी आहे. यावरून हे स्पष्ट होते की, दफन केल्यानंतर लगेचच मारियनने त्याच्या आईचा मृतदेह बाहेर काढला आणि त्याची मम्मी बनवून तिला घरात जतन करून ठेवले. असे सांगितले जाते की, मारियन स्मशानभूमीपासून 300 मीटर दूर राहतो आणि त्याने आपल्या आईचा मृतदेह दुचाकीवरून आपल्या घरी परत नेला. (हेही वाचा: US: अमेरिकेत भारतीय वंशाच्या मुलीची हत्या; कोर्टाने दोषीला सुनावली 100 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा)

मृतदेहाची मम्मी करण्यासाठी मारियनने रसायनाचा वापर केला होता, असेही समोर आले आहे. मृतदेहातून मॉथबॉलचा वासही येत होता. एवढ्या वर्षांनंतरही मृतदेहाची स्थिती चांगली असल्याचेही सांगण्यात आले. मारियनला ताब्यात घेऊन मृतदेह पुन्हा पुरण्यात आला आहे. ही घटना फेब्रुवारी महिन्यात समोर आली. मरियनवर मृतदेहाशी छेडछाड केल्याचा आरोप आहे. तो एकटाच राहत होता आणि त्याच्या शेजाऱ्यांना त्याचे नावही माहीत नव्हते, असेही पोलिसांनी सांगितले.