Nobel prize 2018 : विल्यम नोर्दहॉस आणि पॉल रॉमर ठरले यावर्षीच्या अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी
विल्यम नोर्दहॉस आणि पॉल रोमर (Photo Credit-Twitter)

विल्यम नोर्दहॉस आणि पॉल रॉमर या दोन अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांना यावर्षीचे मानाचे अर्थशास्त्रातील नोबेल प्राप्त झाले आहे. हवामान बदल आणि आर्थिक विकासाबाबत केलेल्या संशोधनासाठी रॉयल स्विडीश अकॅडमी ऑफ सायन्सेसने सोमवारी या दोघांच्या नावाची नोबेल पुरस्कारासाठी घोषणा केली.

या शास्त्रज्ञांनी हवामान बदलाचा सामना करत आर्थिक विकास कसा साधता येईल याबाबत संशोधन केले असून, त्यांच्या याच कार्याचा गौरव हा प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार देऊन करण्यात येत आहे.

नोर्दहॉस हे अमेरिकेतील येल विद्यापीठात प्राध्यापक आहेत, तर रोमर यांनी जागतिक बँकेचे माजी प्रमुख अर्थतज्ञ व उपाध्यपद भूषवले आहे. या दोन्ही अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांना पुरस्काराच्या रुपाने 90 लाख स्वीडिश क्रोनर (सुमारे 7.35 कोटी रुपये) मिळणार आहेत. 1969 पासून सुरुवात झालेल्या या पुरस्काराने आत्तापर्यंत 79 अर्थतज्ञांना गौरवण्यात आले आहे.