कोरोना विषाणू (Coronavirus) चा प्रसार सध्या संपूर्ण जगात झाला आहे. मानव, वटवाघूळ, कुत्रा आणि मांजरांना या विषाणूची लागण झाल्याचे तुम्ही ऐकले असेल, पण आता आफ्रिकी देशात बकरी व फळांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे व हा देश आहे टांझानिया (Tanzania). टांझानियामध्ये बकरी आणि विशिष्ट प्रकारच्या पपई फळांमध्ये (Pawpaw) कोरोनाचा संसर्ग आढळला आहे. यानंतर देशाचे राष्ट्राध्यक्ष जॉन मगुफुली (John Magufuli) यांनी संपूर्ण खापर टेस्टिंग कीटवर (Testing kits) फोडले असून, त्यांनी चाचणी किटच खराब असल्याचे म्हटले आहे. आता या चाचणी किटची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मगुफुली यांनी यापूर्वी सुरक्षा दलाला ‘आयात’ केलेल्या चाचणी किटच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यास सांगितले होते. त्यानुसार टांझानियामध्ये बकरी, मेंढ्या व पॉपॉ फळाचे नमुने घेण्यात आले होते व हे नमुने तपासणीसाठी टांझानियन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. आता रविवारी बकरी आणि पॉपॉ फळामध्ये कोरोना विषाणू आढळले. नंतर, एका कार्यक्रमात बोलताना, अध्यक्षांनी चाचणी कीट खराब असल्याचे सांगत, यामुळे ज्यांना विषाणूचा संसर्ग झाला नव्हता अशा बर्याच नागरिकांची तपासणी सकारात्मक आली असल्याचे सांगितले. आता अशा किट्सची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.
दुसरीकडे, मादागास्करच्या अध्यक्षांनी वैज्ञानिक चाचणी न होताच कोरोना विषाणूवर औषध सापडल्याचे सांगितले आहे. आता टांझानियाचे अध्यक्ष म्हणाले आहेत की, ‘आम्ही मादागास्करच्या अध्यक्षांच्या संपर्कात आहोत, त्यांना एक औषध मिळाले आहे. आम्ही तेथे एक विमान पाठवू आणि ते औषध आपल्या देशात आणले जाईल, जेणेकरून टांझानियावासीयांनाही त्याचा फायदा होईल.’
(हेही वाचा: लॉक डाऊनचे नियम शिथिल; इटलीची फिल्म इंडस्ट्री पुन्हा सुरु, तर इराणमध्ये मशिदी आणि शाळा उघडण्यास परवानगी)
दरम्यान, आशिया, युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत कोविड-19 साथीच्या रोगाचा आफ्रिकेला कमी फटका बसला आहे. आतापर्यंत, इथे 45,466 प्रकरणे आणि 1,802 मृत्यूची नोंद झाली आहे.