फिलीपिन्सच्या (Philippines) राजधानीच्या दक्षिणेस, 'ताल' नावाच्या एका ज्वालामुखीने (Taal Volcano) लावा आणि मोठ्या प्रमाणात राख बाहेर टाकणे सुरु केले आहे. हा ज्वालामुखी आता पूर्णपणे सक्रिय झाला आहे, त्यामुळे हजारो लोकांना या प्रदेशातून हलविण्यात आले आहे. स्फोट होण्याच्या भीतीने देशातील मुख्य विमानतळावरील 500 उड्डाणे थांबविण्यात आली आहेत. या ज्वालामुखीच्या आजूबाजूच्या 14 किमी क्षेत्रात सुमारे 4.5 लाख लोक राहतात, यातील अनेक जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
रविवारी संध्याकाळी 'ताल' या ज्वालामुखीच्या उद्रेकापूर्वी भूकंपाचे कित्येक धक्केसुद्धा जाणवले. या भूकंपांमधून बचाव झालेल्या सुमारे 13,000 लोकांना परिसरातील निर्वासित केंद्रांवर नेण्यात आले आहे. तर तालमुळे बाधित होणाऱ्या हजारो लोकांनाही सुरक्षित भागात हलविण्यात आले आहे. हा ज्वालामुखी सतत लावा उगाळत आहे, तर त्याची राख बाधित भागापासून दूर राजधानी मनिलाच्या 100 किलोमीटर पुढे पोहचली आहे.
या गोष्टीमुळे शाळा आणि सरकारी कार्यालयांव्यतिरिक्त, खबरदारीचा उपाय म्हणून स्टॉक एक्सचेंजलाही बंद ठेवण्यात आले आहे. श्वसनाच्या समस्येने ग्रस्त लोकांची काळजी घेण्याच्या सूचना आरोग्य अधिका्यांना दिल्या आहेत. फिलिपाईन्स इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्कानोलॉजी अँड सिस्मोलॉजी (फिव्हॉल्क्स) ने सध्या सतर्कतेची पातळी 3 वरून 4 पर्यंत वाढविली आहे. याचाच अर्थ ही गंभीर धोक्याची चिन्हे आहेत. (हेही वाचा: इराणचा अमेरिकेवर पलटवार; लष्करी तळांवर डागली 12 क्षेपणास्त्रे)
फिलिपिन्समधील ताल सरोवरावर असलेला हा ज्वालामुखी फुटल्याने मनिलामधील हवामान खूपच खराब झाले आहे. त्याचा लावा सुमारे 10-15 किमी अंतरावर पसरलेला आहे. ज्वालामुखी फुटल्यास, लावा तलावामध्ये पडल्यास आसपासच्या भागात त्सुनामी येऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. ताल हा फिलिपिन्समधील दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा ज्वालामुखी आहे. गेल्या 450 वर्षात तो 34 वेळा फुटला आहे. शेवटचा तो 1977 मध्ये फुटला होता.