
Pakistani Soldiers Killed In Suicide Bomber Attacks: शनिवारी खैबर पख्तूनख्वा (Khyber Pakhtunkhwa) येथील उत्तर वझिरीस्तानमधील खाद्दी भागात लष्करी ताफ्याला लक्ष्य करून झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात (Suicide Bomber Attack) किमान 13 पाकिस्तानी सैनिक ठार झाले. तसेच अनेक जण जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार, हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन बॉम्ब निकामी करणाऱ्या युनिटच्या वाहनावर आदळवले. स्थानिक माध्यमांनुसार, इत्तेहाद-उल-मुजाहिदीन पाकिस्तानशी संलग्न असलेल्या असवाद-उल-हर्ब गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
जखमींमध्ये 10 सैनिक आणि 19 नागरिकांचा समावेश आहे. अनेक जखमी सैनिकांची प्रकृती चिंताजनक आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर, एका स्थानिक सरकारी अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की, एका आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन लष्करी ताफ्यावर आदळवले, ज्यामुळे मोठा स्फोट झाला. पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, स्फोट इतका जोरदार होता की जवळच्या दोन घरांच्या छतांवरही पडझड झाली, ज्यामध्ये सहा मुले जखमी झाली. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) शी संबंधित एका संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. (हेही वाचा - Ayatollah Ali Khamenei Warning: इराण पुन्हा अमेरिकन तळांवर हल्ला करेल; अयातुल्ला अली खामेनी यांचा कडक इशारा)
खैबर पख्तूनख्वामध्ये हिंसाचार -
दरम्यान, अलिकडच्या काळात खैबर पख्तूनख्वामध्ये हिंसाचारात मोठी वाढ झाली आहे. मार्चच्या मध्यात, टीटीपीने सुरक्षा दलांविरुद्ध मोहीम जाहीर केली, ज्यामध्ये त्यांनी हल्ला आणि आत्मघाती बॉम्बस्फोटांची धमकी दिली होती. तेव्हापासून, संघटनेने खैबर पख्तूनख्वामध्ये सुमारे 100 हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, या वर्षी मार्चमध्ये, दक्षिण वझिरीस्तानमधील जंडोला चेकपोस्टजवळील फ्रंटियर कॉर्प्स कॅम्पला लक्ष्य करून झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानी लष्कराने टीटीपीशी संबंधित 10 संशयित अतिरेक्यांना ठार मारले होते.
तथापी, काही दिवसांपूर्वी बलुच लिबरेशन आर्मी (BLA) च्या अतिरेक्यांनी गुडालर आणि पिरू कुन्री जवळ जाफर एक्सप्रेस पॅसेंजर ट्रेनवर प्राणघातक हल्ला केला होता. ज्यामुळे 21 नागरिक आणि चार निमलष्करी कर्मचारी ठार झाले होते. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2025 नुसार, पाकिस्तानमध्ये दहशतवादाशी संबंधित मृत्यूंमध्ये 45 टक्के वाढ झाली आहे.