Sputnik V | Image used for Representational purpose only | File Image

सध्या कोरोना विषाणूवर (Coronavirus) मात करण्यासाठी लस हाच एक महत्वाचा उपाय असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक देश कोरोना विषाणूविरोधी लस तयार करत आहेत. दरम्यान, रशियाने आपल्या स्पुतनिक व्ही कोरोना लसीच्या (Sputnik V Vaccine) परिणामाविषयी माहिती दिली आहे. स्पुतनिक व्ही कोरोना लस कोरोनाच्या डेल्टा प्रकाराविरुद्ध 83% प्रभावी ठरली आहे. रशियाचे आरोग्य मंत्री मिखाईल मुराश्को यांनी ही माहिती दिली. याव्यतिरिक्त, स्पुतनिक व्ही च्या विकसकांनी सांगितले की, ही लस कोरोना व्हायरसच्या सर्व नवीन व्हेरिएंटविरूद्ध प्रभावी आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मिखाईल मुराश्को म्हणाले की, डेल्टा स्ट्रेनशी लढण्यासाठी स्पुतनिक व्ही लस सर्वात प्रभावी परिणाम दर्शवते. नवीन परिणाम सूचित करतात की  त्याची कार्यक्षमता सुमारे 83 टक्के आहे. म्हणूनच स्पुतनिक लस गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांच्या हॉस्पिटलायझेशनची गरज कमी करते. तसेच ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि अत्यंत प्रभावी असल्याचेही रशियाकडून सांगण्यात आले आहे. रशियाची स्पुतनिक व्ही लस भारतात डॉ रेड्डी लॅबोरेटरीज लि.ने तयार केली आहे.

रशियाकडून असेही सांगण्यात आले आहे की, ही लस संसर्गाचा धोका सहा पटीने कमी करते. एवढेच नाही तर ही लस हॉस्पिटलायझेशन धोका 94.4 टक्के कमी करते. ही लस घेतल्याने रुग्णालयात दाखल होण्याचा धोका 18 पट कमी होतो. सध्या, रशियाच्या कोविड-19 लस स्पुतनिक व्हिला जगातील 69 देशांनी मान्यता दिली आहे. या देशांची एकूण लोकसंख्या 3.7 अब्जाहून अधिक आहे म्हणजेच जागतिक लोकसंख्येच्या जवळजवळ निम्मी आहे. (हेही वाचा: Marburg Virus: घातक मारबर्ग विषाणू संसर्गामुळे पश्चिम अफ्रिकेत एकाचा मृत्यू; जागतिक आरोग्य संघटनेकडून पुष्टी)

या लसीच्या निर्मितीसाठी RDIF ने भारत, चीन, दक्षिण कोरिया, अर्जेंटिना, मेक्सिको आणि इतर देशांतील आघाडीच्या उत्पादकांशी भागीदारी केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये डेल्टा प्लस रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात कोरोना विषाणूचे जिनोमिक सिक्वेंसिंग नियमित स्वरुपात करण्यात येत आहे. आज सी.एस.आय.आर.आय जी आय बी प्रयोगशाळेने आणखी 20 डेल्टा प्लस रुग्ण शोधले असून त्यामुळे, राज्यात आतापर्यंत आढळलेल्या डेल्टा प्लस रुग्णांची संख्या 65 झाली आहे.

नव्याने आढळलेले 20 रुग्ण हे मुंबई 7,  पुणे 3, नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर प्रत्येकी 2, चंद्रपूर आणि अकोला प्रत्येकी 1 असे आहेत.