अमेरिकेत एका शाळेमध्ये सोमवार (24 ऑक्टोबर) दिवशी अजून एक थरारनाट्य रंगलं आहे. 19 वर्षीय माथेफिरूने गोळीबार करत एक शिक्षक आणि विद्यार्थीनीचा जीव घेतला आहे. नंतर पोलिसांसोबत झालेल्या झटापटीमध्ये गोळीबार करणार्याचाही मृत्यू झाला आहे. ही घटना मिसौरी मधिल सेंट लुईस शाळेतील आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ पसरली आहे. दरम्यान यंदाच्या वर्षातील ही 40 वी घटना आहे.
मीडीया रिपोर्ट्स नुसार, अमेरिकेच्या मध्य पश्चिमी भागात सेंट लुईस, मिसौरी भागात ही शाळा आहे. पोलिसांनी हल्लेखोरावर गोळीबार केला. किसेंट्रल विजुअल एंड परफॉर्मिंग आर्ट्स हाई स्कूल मध्ये झालेल्या या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस आयुक्त माइकल सैक यांनी दिली आहे. काही जणांवर बंदुकाच्या गोळ्यांमुळे जखमा झाल्या आहेत. अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजता हल्ला झाला आणि तातडीने पोलिसांना कळवताच 9.10 च्या सुमारास पोलिसदेखील घटनास्थळी आले. 10.30 पर्यंत पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली होती. दरम्यान पोलिसांनी माहिती देताना गनमॅन शाळेत कसा घुसला हे सांगणं टाळलं आहे.
शाळेत विद्यार्थ्यांनी सेंट लुईस पोस्ट डिस्पॅच ला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की अनेकांनी सुरक्षित राहण्यासाठी स्वतःला आपापल्या खोलीत कोंडून घेतले. अद्याप गोळीबार करणार्या व्यक्तीची ओळख पटू शकलेली नाही. मात्र पोलिसांनी त्याच वय अंदाजे 19-20 वर्ष सांगितलं आहे. त्याचा गोळीबार करण्यामागील उद्देश देखील स्पष्ट झालेला नसल्याचं म्हटलं आहे.
अमेरिकेत गोळीबारीची ही पहिलीच घटना नाही. मे महिन्यात अमेरिकेच्या टेक्सास भागात एका शाळेत झालेल्या फायरिंग मध्ये 18 मुलांसह 21 जणांचा जीव गेला होता. त्यावेळी दुसरी, तिसरी आणि चौथी मध्ये शिकणारी लहान मुलं होती. त्यावेळी देखील हल्लेखोर मारला गेला होता.
मागील काही महिन्यात अमेरिकेमध्ये सातत्याने गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत.