या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) काळात लोकांना मास्कचे (Mask) महत्त्व चांगलेच समजले आहे. या महामारीपूर्वी बहुतेक लोकांनी मास्कचा वापरही केला नसेल, पण आता लोकांना समजले आहे की, कोरोनापासून वाचायचे असेल तर मास्क घालणे आवश्यक आहे, कारण कोविड लसीकरणानंतरही मोठ्या प्रमाणात लोकांना संसर्ग होत आहे. अशा परिस्थितीत, मास्क आणि सुरक्षित शारीरिक अंतर हा संरक्षणाचा सर्वोत्तम मार्ग आहे. तरीही अनेकांना या आजाराचे गांभीर्य नाही. अनेक लोक मास्क घालत नाहीत किंवा घातला तर तो काढत राहतात. अशा लोकांसाठी सरकारने दंडाची तरतूद केली आहे. ब्रिटनमधून असेच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे अवघ्या काही काळासाठी नाकावरून मास्क काढल्याबद्दल एका व्यक्तीला लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
ब्रिटनमधील रहिवासी असलेल्या क्रिस्टोफर ओटूल नावाच्या व्यक्तीने दावा केला आहे की, तो खरेदीसाठी बाहेर गेला होता आणि त्याने दुकानात काही सेकंदांसाठी चेहऱ्यावरील मास्क काढला होता, परंतु त्या बदल्यात त्याला सुमारे 2 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. मिररच्या रिपोर्टनुसार, त्या व्यक्तीने सांगितले की, त्याला मास्क घालण्यात कोणतीही अडचण नाही, परंतु त्याने बराच वेळ मास्क घातला होता म्हणून त्याने अवघ्या 16 सेकंदांसाठी मास्क काढला. दरम्यान, काही पोलीस दुकानात आले आणि त्यांनी क्रिस्टोफरसह ज्यांनी मास्क घातला नाही अशा लोकांची नावे टिपून घेतली.
रिपोर्टनुसार, ही घटना गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात घडली होती. त्यावेळी ब्रिटनमध्ये कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत होती, त्यामुळे मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले होते. क्रिस्टोफरच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या काही दिवसांनंतर त्याला क्रिमिनल रेकॉर्ड ऑफिसकडून एक पत्र मिळाले, ज्यामध्ये त्याला सुमारे 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आणि तो भरण्यास सांगितले. (हेही वाचा: 11 वर्षाच्या मुलाला Covid-19 च्या अल्फा, डेल्टा आणि ओमायक्रॉन प्रकारांची लागण; तब्येत स्थिर)
त्यानंतर क्रिस्टोफरने अधिकाऱ्यांना मेल करून स्वतःचे स्पष्टीकरण दिउले. परंतु त्यानंतर त्याला क्रिमिनल रेकॉर्ड ऑफिसकडून एक पत्र आले, ज्यामध्ये त्याच्या दंडाची रक्कम सुमारे 2 लाख रुपये करण्यात आली. आता एवढी मोठी रक्कम पाहून क्रिस्टोफरला आश्चर्य वाटले आणि त्याने हे प्रकरण न्यायालयात नेले. सध्या त्याचे प्रकरण न्यायालयात आहे.