
सध्या ऑनलाइन डेटिंगची (Online Dating) क्रेझ खूप वाढली आहे. या डिजिटल युगात अनेक लोक ऑनलाइन डेटिंग अॅप्सचा वापर करत आहेत. मात्र अशा अॅप्सद्वारे ज्या अनोळखी व्यक्ती भेटतात त्यांच्यावर कितपत आणि कसा विश्वास ठेवायचा हा एक मोठा प्रश्न आहे. आता ऑनलाइन डेटिंगशी संबंधित एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण जर्मनीचे (Germany) आहे, जिथे 41 वर्षांच्या शिक्षकावर आरोप आहे की त्याने डेटिंग अॅपद्वारे एका व्यक्तीला डेटसाठी बोलावले आणि नंतर त्याची हत्या करून त्याच्या शरीराचे तुकडे खाल्ले.
बर्लिनमध्ये (Berlin) ही घटना घडली असून, आरोपीचे नाव स्टीफन आर असे आहे. स्टीफनने आपल्या लैंगिक तृप्तीसाठी डेटवर आलेल्या व्यक्तीच्या शरीराचे काही भाग खाल्ले असल्याचा आरोप आहे. हत्येच्या काही तासांपूर्वीच ऑनलाइन डेटिंग साइटवर हे दोघे भेटले होते. पीडित व्यक्तीचे नाव स्टीफन टी असून तो 43 वर्षांचा मेकॅनिक होता. गेल्या सप्टेंबरमध्ये त्याची हत्या झाली होती व नोव्हेंबरमध्ये त्याच्या शरीराचे इतर भाग आणि अवशेष बर्लिनच्या विविध परिसरात आढळले होते.
जर्मन न्यूज वायर डीपीएने दिलेल्या वृत्तानुसार, संशयिताने बर्लिन-पॅन्को अपार्टमेंटमध्ये स्टीफन टीची हत्या करून त्याच्या शरीराचे तुकडे भक्षण केले. पुढे तपासात, डेटिंग साइटजवळ मानवी शरीराची हाडे आढळली होती. नंतर पोलिसांनी स्निफर डॉगच्या मदतीने उर्वरित हाडे शोधली. फॉरेन्सिक तपासणीत हे स्पष्ट झाले की ही हाडे स्टीफन टीची आहेत. या प्रकरणावर बोलताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या पद्धतीने हाडांमधून मांस काढण्यात आले आहे, त्यावरून हे स्पष्ट होते की मारेकरी नरभक्षक आहे.
एका समलिंगी डेटिंग वेबसाइटवर या कथित मारेकरी आणि पीडित यांच्यातील संदेशांची देवाणघेवाण पोलिसांच्या हाती, ज्यामधून समजले की हे दोघेही भेटणार होते. संशयिताने म्हणजेच स्टीफन आरने ऑनलाईन ‘नरभक्षण’ कंटेंट शोधला होता. तसेच, एखाद्या व्यक्तीचे लिंग कापल्यानंतर ती व्यक्ती जिवंत राहू शकते की नाही? या प्रश्नाचे उत्तरही इंटरनेटवर शोधले होते. पोलिसांना स्टीफन आरच्या इंटरनेट हिस्टरीमध्ये अशा काही गोष्टी सापडल्या ज्यावरून हे दिसून येत होते की आरोपीला नरभक्षणात रस आहे. (हेही वाचा: धक्कादायक! पोलिसाचा खून करून त्याच्या शरीराचे अवयव शिजवून खाल्ले; पिता-पुत्राला 15 वर्षांची शिक्षा)
दरम्यान, आरोपी रसायनशास्त्राचा शिक्षक आहे. त्याच्या फ्लॅटमधून चाकू तसेच रक्ताचे ट्रेस आणि काही रसायनेही सापडली आहेत. बर्लिन राज्य न्यायालयात खटला ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे.