दंत समस्या (Teeth Problems) ही कोणासाठीही नवीन गोष्ट नाही. बहुतेक लोकांनी त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी तरी डेंटीस्टना भेट दिली असेल. अनेकवेळा दातांच्या अशा काही समस्या उद्भवतात ज्यावर उपाय म्हणून दंतवैद्याकडून दात काढून घेणे भाग ठरते. अशी दातांची समस्या ब्रिटनमधील (United Kingdom) 42 वर्षीय महिलेलाही होती, मात्र त्यासाठी दंतवैद्याकडे जाण्याऐवजी तिने स्वतःचा उपाय शोधला. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल मात्र या महिलेने स्वतः आपले 11 दात काढून टाकले आहेत.
ऑनलाईन साइट मिररच्या अहवालानुसार, डॅनियल वॅट्स (Danielle Watts) नावाच्या महिलेच्या दातांमध्ये वेदना होत होत्या. आपले दात दाखवण्यासाठी ती परिसरातील सरकारी रुग्णालयात गेली. मात्र त्या रुग्णालयात तिला दंतवैद्य आढळला नाही. ही महिला गेली गेली सहा वर्षे सरकारी दंतवैद्य शोधत होती मात्र तिला त्यामध्ये तिला यश आले नाही. महिलेकडे खासगी डॉक्टरकडे जाण्यासाठी पैसे नव्हते. अशा परिस्थितीत तिने असे भयंकर पाऊल उचलले, ज्याच्या वेदना तिला कदाचित आयुष्यभर सहन कराव्या लागतील.
जेव्हा महिलेला खाजगी दंतवैद्याच्या शुल्काची माहिती मिळाली तेव्हा तिच्या पायाखालची जमीन हलली. ही फी तिच्या आवाक्याबाहेरची होती. डॉक्टरांची फी परवडत नसल्याने महिलेने स्वतःसाठी एक विचित्र निर्णय घेतला. तिने 3 वर्षात एकामागून एक असे आपले 11 दात काढून टाकले. हे दात काढल्यानंतर डॅनियलच्या तोंडात फक्त काही दात शिल्लक आहेत. सध्या परिस्थिती अशी आहे की, तिने हसणे, आपले तोंड उघडणे बंद केले आहे. याबाबत डॅनियल म्हणते की, 'ही एक अतिशय वेदनादायक प्रक्रिया होती, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.' (हेही वाचा: टीव्हीवर दिसणार नाहीत पिझ्झा खाणाऱ्या महिला, महिलांना पुरुषांनी चहा देण्यावरही बंदी; 'या' सरकारने आणले नवे नियम)
लंडनमध्ये खाजगी दंतचिकित्सकांची फी खूप जास्त आहे, त्यामुळे सर्वसाधारण लोकांना अशा ठिकाणी जाऊन उपचार घेणे कठीण आहे. डॅनियल सुद्धा याच समस्येला बळी पडली आणि आता तिची अवस्था अशी आहे की ती आपले आयुष्य वेदनाशामक औषधांच्या मदतीने घालवत आहे. डॅनियल सांगते की तिने आपला आत्मविश्वास गमावला आहे.