तुम्ही कधी विचार केला आहे की, पिझ्झा (Pizza) आणि ड्रिंक्सच्या जाहिरातींमध्ये महिलांना दिसण्यावर बंदी घातली जाऊ शकते? किंवा जाहिरातीमध्ये एखाद्या पुरुषाला स्त्रीला चहा आणि कॉफी देता येणार नाही. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु इराणच्या (Iran) नवीन टीव्ही सेन्सॉरशिप नियमांनुसार अशाच विचित्र सूचना देण्यात आल्या आहेत. नवीन सेन्सॉरशिप अंतर्गत, इराणमध्ये महिला टीव्हीवर पिझ्झा आणि सँडविच खाताना दिसणार नाही तसेच त्यांच्या हातात कोणतेही लाल रंगाचे पेय देखील दिसणार नाही.
एवढेच नाही तर महिलांना टीव्हीवर चामड्याचे हातमोजे घालण्यासही मनाई आहे. यासोबतच एकीकडे संपूर्ण जग महिला-पुरुष समानतेबद्दल बोलत असताना, इराणमधील वर्कप्लेस संबंधित कोणत्याही दृश्यात कोणताही पुरुष महिलांना चहा आणि कॉफी देताना दिसणार नाही. असे झाल्यास सरकारकडून उत्पादक-दिग्दर्शकांवरही कारवाई होऊ शकते.
इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंग (आयआरआयबी) चे पीआर प्रमुख अमीर हुसेन शमशादी यांनी हा निर्णय दिला आहे. डेली मेलच्या अहवालानुसार, इराणमधील महिलांना टीव्हीवर पिझ्झा-सँडविच खाताना किंवा हातात लेदर ग्लोव्हज घालताना दाखवण्यापूर्वी आयआरआयबीची परवानगी घ्यावी लागेल. घरात स्त्री-पुरुष संबंध दाखवणाऱ्या दृश्यांना जाहिरातीत दाखवण्यासही मनाई केली गेली आहे.
दरम्यान, याआधी इराणमधील एका पुरुषाने एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी गाणे म्हणताना अडवले होते. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. ज्यात महिला हातात गिटार घेऊन गाणे गाताना दिसत आहे तर हा पुरुष तिला थांबवत आहे. (हेही वाचा: चीन आणि तैवानमधील तणाव वाढला; ड्रॅगनने दिली तिसऱ्या महायुद्धाची धमकी, जाणून घ्या सविस्तर)
तालिबानने अलीकडेच अफगाणिस्तानच्या कंधारमध्ये संगीत, रेडिओ आणि दूरदर्शनवर महिलांच्या आवाजावर बंदी घातली आहे. 15 ऑगस्ट रोजी देश ताब्यात आल्यानंतर, अनेक मीडिया कंपन्यांनी महिला अँकर देखील काढून टाकले आहेत. काबूलमध्ये महिलांना कामावर येण्यास परवानगी आहे, मात्र त्यांना फक्त पुरुष जोडीदारासोबतच घराबाहेर पडण्याची परवानगी असेल.