Photo Credit- X

कोरोना महामारीनंतर सध्या जगभरात बेरोजगारीचे सावट आहे. अनेक कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरु आहे. अशात आहे त्या नोकऱ्या टिकवून ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची धडपड सुरु आहे व यासाठी ते खूप जास्त कामाच्या तासांच्या शिफ्ट्समध्ये काम करायला तयार आहेत. मात्र यामुळे त्यांच्या आरोग्याचा चिंता निर्माण झाल्या आहेत. आता जवळपास 18 तास काम केल्यानंतर बाईकवर डुलकी घेत असताना एका 55 वर्षीय फूड डिलिव्हरी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दक्षिण चीनमधील (China) झेजियांग प्रांतातील हांगझोऊ येथे या महिन्याच्या सुरुवातीला ही घटना घडली.

या घटनेचा व्हिडिओ चिनी सोशल मीडिया साइट्सवर व्हायरल होत आहे, त्यानंतर देशभरात डिलिव्हरी एजंट्सच्या कल्याण आणि कायदेशीर अधिकारांबाबत चर्चा सुरू झाली आहे. एका व्यक्तीने सांगितले की हा अन्न वितरण करणारा माणूस रात्री 9 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत त्याच्या वाहनात पडून होता. दुसऱ्या डिलिव्हरी एजंटने त्याला पाहिले व त्यावेळी तो मृतावस्थेत आढळला. युआन असे मृताचे नाव आहे.

युआन त्याच्या कामासाठी प्रसिद्ध होता. लोक त्याला ऑर्डर किंग म्हणून ओळखत होते. युआन दिवसाला 500 ते 600 युआन (5000-7000 रुपये) मिळायचे. पावसाळ्यात तो 700 युआन कमवायचा. युआन कधीकधी पहाटे तीनपर्यंत काम करायचा आणि सकाळी सहा वाजता उठून पुन्हा कामाला लागायचा. थकवा जाणवला की तो बाईकवरच थोडी डुलकी घेत असे. यानंतर तो पुन्हा कामावर रुजू व्हायचा. युआनच्या एका सहकाऱ्याने सांगितले की, या 55 वर्षीय ऑर्डर किंगचा मृत्यूच्या एक महिना आधी अपघातात पाय फ्रॅक्चर झाला होता. 10 दिवस विश्रांती घेतल्यानंतर, तो आपल्या कामावर परतला आणि दोन आठवड्यांनंतर त्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा: EY Pune: कामाचा ताण, नव्या नोकरीत अवघ्या 4 महिन्यात चार्टर्ड अकाउंटंट तरुणीचा मृत्यू; आईचे कंपनीवर गंभीर आरोपांचे पत्र)

युआनचा एक मुलगा हांगझोऊमध्ये शिकत आहे. त्याला एक मोठा मुलगाही आहे, जो विवाहित आहे. युहांग जिल्ह्यातील जियानलिन उपजिल्हा कार्यालयाने या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करणारे निवेदन जारी केले. आणीबाणीच्या उपचारानंतरही युआनचा मृत्यू झाल्याची त्यांनी पुष्टी केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर टीकेचा वर्षाव सुरू झाला.