
शवविच्छेदन (Autopsy) गृह किंवा या प्रक्रियेबाबत लोकांमध्ये भीतीचे वातावरण असते. अनेक लोक अशा ठिकाणांपासून दूर राहणे पसंत करतात. परंतु डोक्यात कोणताही विचार न ठेवता काही लोक या ठिकाणी काम करत असतात. शवविच्छेदन प्रक्रियेमध्ये सहभागी लोकांनाही कधी कधी असे काही अनुभव येतात, जे ऐकून सर्वसामान्य माणूस हादरून जातो. असेच एक विचित्र प्रकरण अमेरिकेतील (USA) मेरीलँडमधून (Maryland) समोर आले आहे. या ठिकाणी शवविच्छेदन तंत्रज्ञांना मृतदेहाच्या आत जिवंत साप आढळला आहे.
शवविच्छेदन गृहामध्ये काम करणाऱ्या 31 वर्षीय जेसिका लोगानने LADbible शी केलेल्या संभाषणात सांगितले की, तिला तिची नोकरी आवडते, तिच्या कामामध्ये तिला रस आहे. आपले काम हे इतरांपेक्षा वेगळे असल्याचे ती म्हणते. परंतु याच कामाशी निगडीत एक भितीदायक अनुभव शेअर करताना तिने सांगितले की, तिला एका मृत माणसाच्या मांडीत जिवंत साप दिसला होता. जेसिका लोगान नऊ वर्षांपासून शवविच्छेदन तंत्रज्ञ म्हणून काम करत आहे, पण हा अनुभव तिच्यासाठी खूप भीतीदायक होता. (हेही वाचा: माकडाच्या पिल्लाने मांडला वाघाच्या बछड्यासोबत खेळ, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)
जेसिकाने सांगितले की, अचानक मृतदेहाच्या मांडीमधून साप बाहेर आल्यानंतर ती किंचाळली व आरडाओरड करत खोलीतून बाहेर पळून गेली. सापाला पकडून बाहेर सोडल्याशिवाय ती त्या खोलीत परत आली नाही. जेसिकाने सांगितले की, व्यक्तीच्या मृत्यूनंतर साप त्याच्या शरीरात शिरला होता. मृताच्या मृतदेहाची अवस्था अत्यंत बिकट होती. नाल्यात मृतदेह आढळून आला होता.
दरम्यान, शवविच्छेदन तंत्रज्ञ जेसिकाने सांगितले की, मृत व्यक्ती कोणत्या स्थितीत सापडतात यावर मृतदेहाची स्थिती अवलंबून असते. जर शव कोरडे आणि थंड असेल तर त्यात सहसा जास्त कीटक आढळत नाहीत. पण जर ते उष्ण आणि दमट असेल तर शरीरात खूप जंत असतात. अनेक प्रकरणांमध्ये शरीरात असे साप, कीटक किंवा तत्सम गोष्टी आढळतात, परंतु कर्मचार्यांसमोर कोणताही पर्याय नसतो. त्यांना आपली भीती बाजूला ठेऊन अशा शरीरावर काम करावे लागते.