Sheikh Hasina | (Photo Credit- Facebook)

Sheikh Hasina On Dhaka Violence: बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी मायदेशीच्या नागरिकांना उद्देशून भावनीक उद्गार काढले आहेत. हिंसक जमावाने त्यांच्या वडिलांचे म्हणजेच शेख मुजीबुर रहमान (Sheikh Mujibur Rahman) ढाका येथील ऐतिहासिक निवासस्थानावर हल्ला (Bangabandhu House Attack) केला आणि त्याची तोडफोड केली. या घटनेचा तीव्र निषेध करत हसीना यांनी आश्रुपूर्ण नयनांनी एक संदेश दिला. ज्यामध्ये म्हटले की, 'एखादी रचना नष्ट करता येऊ शकते पण, इतिहास केव्हाच पुसला जात नाही.' दरम्यान, प्राप्त माहितीनुसार, बांगलादेशातल शेकडो नागरिक निदर्शने करत बुधवारी (5 फेब्रुवारी) रात्री शेख रहमान यांच्या 32 धनमोंडी येथील घराबाहेर एकत्र जमले आणि त्यांनी घराला आग लावली. पुढच्या काहीच क्षणार्धात ही ऐतिहासिक वास्तू आगीच्या भक्षस्थानी पडली.

हल्लेखोरांना आमच्या घराची भीती का वाटते? हसीना यांचा सवाल

शेख हसीना यांनी प्रदीर्घ काळानंतर त्यांच्या अवामी लीगच्या फेसबुक पेजवरुन एका ऑडिओ संदेशाद्वारे आपल्या राष्ट्रातील जनतेला आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. शेख हसीना यांची 16 वर्षांची राजवट विद्यार्थी आंदोलनाने उलथून टाकल्यानंतर त्या प्रथमच जनतेला उद्देशून बोलत होत्या. आपल्या संदेशामध्ये त्यांनी म्हटले की, 'हल्लेखोरांना आमच्या घराची भीती का वाटते? आजही मला धनमोंडी येथील आठवणी येतात. पाठिमागच्या वेळीही त्यांनी आमच्या घराला आग लावली होती. आताही ते घर ते उद्ध्वस्त करत आहेत. मी या देशासाठी काहीच केले नाही? आजही मी आणि माझी बहीण या आठवणींसोबत कायम आहोत. मी आमच्या लोकांना विचारु इच्छिते या सर्व घटनांच्या पाठिमागे कोण आहे? मला न्याय हवा आहे. लक्षात ठेवा, एखादी रचना मोटता, तोडता येते, पुसून टाकता येते इतिहास पुसला जात नाही.' (हेही वाचा, बांग्लादेश संस्थापक शेख मुजीबुर रहमान हत्या प्रकरणात माजी सैन्य अधिकाऱ्यास फाशी)

'इतिहास कोणालाही क्षमा करत नाही'

सोशल मीडियावरील ऑडिओ संदेशात जमावाला उद्देशून इशारा देताना शेख हसिना म्हणाल्या, 'इतिहास कोणालाही क्षमा करत नाही. तो सर्वांना आपली जागा दाखवतो.' दरम्यान, प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'बुलडोझर मिरवणुकी' च्या आवाहनानंतर हजारो निदर्शक ढाका येथील धनमोंडी येथील बंगबंधू स्मारक संग्रहालयाबाहेर जमले. बुधवारी रात्री 9.00 वाजता (BST) हसीनाच्या नियोजित व्हर्च्युअल भाषणादरम्यानच हे निदर्शन झाले.

ऑडिओ संदेशाद्वारे शेख हसीना यांचा बांग्लादेशच्या जनतेशी संवाद

दरम्यान, शेख हसीना यांनी त्या बांगलादेशच्या पंतप्रधान असताना देशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या घराचे सार्वजनिक स्मारकात रूपांतर केले होते. हे घरच आता आंदोलकांकडून उद्ध्वस्त केले गेले आहे. या प्रकारानंतर शेख हसीना यांनी मुहम्मद युनूस यांच्या सरकारवर हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला आहे. हसीनांनी नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्या नवीन सरकारने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे.