Adnan Oktar (संग्रहित संपादित प्रतिमा)

इस्लामिक टेलिव्हिजन प्रचारक आणि लेखक अदनान ओक्तर (Adnan Oktar) याला लैंगिक गुन्ह्यांसाठी (Sex Crimes) 1075 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तुर्कीच्या मुस्लीम धर्मियांचा एक पंथप्रमुख अदनान ओक्तर याला इस्तंबूलच्या कोर्टाने 10 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सोमवारी ही शिक्षा सुनावली. अदनान हा एका पंथांचा प्रमुख आहे आणि फिर्यादी त्याच्या संघटनेस गुन्हेगार मानतात. 2018 मध्ये, देशभरात मारण्यात आलेल्या छाप्यात ओक्तरच्या अनेक अनुयायांना अटक करण्यात आली होती. अदनान ओक्तर लोकांना कट्टरपंथी बनवण्यासाठी उपदेश देत होता. राज्य माध्यमांनुसार, अदनानवर गुन्हेगारी टोळी बनवून त्यांचे नेतृत्व करणे, फसवणूक आणि लैंगिक अत्याचार या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले आहे.

अदनान ओक्तर याला दिलेली ही शिक्षा सतत चालू राहणार आहे. मात्र, त्याने आपल्यावरील आरोप फेटाळून लावत स्वतःची सुटका करण्याची मागणी केली आहे. ओक्‍तार यापूर्वी स्वत: चे टेलीव्हिजन चॅनेल ए 9 चालवत असे. ज्यामध्ये तो इस्लामिक विषयांशी संबंधित टॉक शो होस्ट करत असे. स्थानिक माध्यमांनी असेही संगीतके की, एकदा ओक्तरने मुलींसह केलेल्या नृत्याचे प्रसारणही केले होते.

जुलै 2018 मध्ये इस्तंबूल पोलिसांनी अदनानला अटक केली. त्याच्यासमवेत अन्य 77 जणांना खटल्याच्या वेळी कस्टडीमध्ये ठेवण्यात आले होते. सरकारी बातमी संस्था अनादोलूने म्हटले आहे की, ओक्तार आणि त्याच्या 13 उच्च-स्तरीय लोकांच्या गटाला एकूण 9803 वर्षे आणि सहा महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये एकट्या अदनानना 1000 वर्षापेक्षा जास्त शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने ओक्तरचे दोन कार्यकारी तरकन यावस याला 211 वर्ष आणि ओक्तार बाबुनाला 186 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. (हेही वाचा: Saudi Arabia चा प्रिन्स मोहम्मद बिन सलमान उभारणार गाड्या व रस्ते नसणारे शहर; जाणून घ्या काय असेल खास)

डिसेंबरमध्ये खटल्याच्या वेळी, ओक्तारने न्यायाधीशांना सांगितले की त्याच्या 1000 गर्लफ्रेंड्स आहेत. त्याच वेळी, ऑक्टोबरच्या सुरुवातीस, दुसऱ्या एका सुनावणीत तो म्हणाला होता की, 'माझ्या मनात स्त्रियांबद्दलचे प्रेम वाढते. प्रेम ही मानवी भावना आहे, मुसलमान असण्याचा हा गुण आहे.’ या इस्लामिक टीव्ही उपदेशकाच्या संकेतस्थळावरून असे दिसून येते की त्याने 300 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांचे 73 भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.