सौदी अरेबियाचा (Saudi Arabia) प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (Prince Mohammad Bin Salman) एक खास शहर बांधत आहे, जिथे ना गाड्या असतील नाही रस्ते. या नवीन शहरात शून्य कार्बन उत्सर्जन असेल. निओम (NEOM) प्रकल्पांतर्गत सुमारे 170 कि.मी. लांबीमध्ये शहर वसवण्याची प्रिन्सची योजना आहे. या प्रकल्पाला 'द लाइन' असे नाव देण्यात आले आहे. निओम शहर तयार करून तेलाने संपन्न असलेला देश सौदी अरेबिया स्वत: साठी विना तेलाचे भविष्य शोधत आहे. या शहराच्या बांधकामाला यंदाच्या पहिल्या तिमाहीत सुरुवात होईल. टीव्हीच्या माध्यमातून प्रिन्सने या प्रकल्पाची माहिती दिली. महत्त्वाचे म्हणजे हे शहर लाल समुद्राच्या काठावर विकसित केले गेले आहे.
सौदी अरेबियातील निओम या नवीन शहरात दहा लाख लोक राहू शकतील अशी व्यवस्था असणार आहे. यामध्ये शाळा, आरोग्य केंद्रे आणि भरपूर झाडे यासारख्या सुविधा असतील. तेथे 3,80,000 लोकांना रोजगार निर्मिती होईल. प्रिन्सने सांगितले आहे की, या शहराच्या पायाभूत सुविधांसाठी 100-200 अब्ज डॉलर्स खर्च येईल. प्रिन्स म्हणाले की निओम शहरात हाय-स्पीड सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तयार केली जाईल. या शहराच्या विकासात आर्टिफिशिअल इंटेलिजंस महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. हे शहर 100 टक्के स्वच्छ उर्जाद्वारे चालविले जाईल आणि इथल्या रहिवाशांना प्रदूषणमुक्त, आरोग्यदायी आणि अधिक योग्य वातावरण प्रदान करेल. (हेही वाचा: पाकिस्तानच्या Hazara University मध्ये जीन्स, शॉर्ट-स्लीव्ह शर्ट, मेकअप वर बंदी; विद्यापीठाने विद्यार्थी व शिक्षकांसाठी लागू केला ड्रेस कोड)
सौदी अरेबिया जगातील अग्रगण्य कच्च्या तेलाची निर्यात करणारा देश आहे आणि सर्वाधिक प्रदूषण करणार्या देशांमध्येही समाविष्टतो आहे. आता निओम शहर तयार करून प्रिन्स विनातेलाच्या भविष्याचा शोध घेत आहेत. निओम शहर 26,500 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरले जाईल आणि त्याच्या सीमा जॉर्डन आणि इजिप्तला स्पर्श करतील. 2017 मध्ये निओम तयार करण्याची घोषणा केली गेली होती. एका अंदाजानुसार 2030 पर्यंत हे शहर सौदी अरेबियाच्या जीडीपीमध्ये सुमारे 48 अब्ज डॉलर्सचे योगदान देईल.