पाकिस्तानच्या Hazara University मध्ये जीन्स, शॉर्ट-स्लीव्ह शर्ट, मेकअप वर बंदी; विद्यापीठाने विद्यार्थी व शिक्षकांसाठी लागू केला ड्रेस कोड
Jeans (Photo credits: Pixabay.com)

पाकिस्तानच्या (Pakistan) खैबर पख्तूनख्वामध्ये हजारा विद्यापीठाने (Hazara University) विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ड्रेस कोड (Dress Code) लागू केला आहे. मुलींना जीन्स, शॉर्ट-स्लीव्ह शर्ट आणि टी-शर्ट घालण्यास मनाई आहे. तसेच मुलींनी भडक मेकअप करू नये असेही सांगितले आहे. मुलांसाठी बाली, कानातले आणि लांब केसांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याच वेळी, हेच समान निर्बंध महिला आणि पुरुष शिक्षकांना लागू आहेत. अशाप्रकारे पाकिस्तानातील पुरातन दृष्टिकोन असणार्‍या लोकांची विचारसरणी आता विद्यापीठातही दिसून येत आहे. सरकारने यासंदर्भात एक हास्यास्पद विधान केले असून असे म्हटले आहे की यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे अधिक लक्ष दिले जाऊ शकते.

विद्यापीठ प्रशासनाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार विद्यार्थ्यांना जीन्स, टी-शर्ट, हाफ जीन्स आणि मेकअप करून विद्यापीठात येऊ नका असे सांगण्यात आले आहे. याशिवाय विद्यापीठात येताना महागड्या Hand Bags आणि दागिने घालण्यास बंदी आहे. विद्यार्थ्यांनी शाल, अबया आणि सलवार-कमीज सारखे सभ्य पोशाख घालून विद्यापीठात यावे, असे सांगितले गेले आहे.

यासह पुरुष विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्या शॉर्ट्स, चप्पल, लांब केस, पोनीटेल, अंगठ्या घालण्यावरही प्रशासनाने बंदी घातली आहे. तसेच, सभ्य पद्धतीने दाढी करण्याचा सल्ला दिला आहे. पुरुषांना पँट-शर्ट किंवा कुर्ता-पायजामा घालण्याकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर या आदेशाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. बर्‍याच लोकांनी यावर टीका केली आहे आणि त्याला मोरल पोलिसिंग म्हटले आहे. (हेही वाचा: भारताने केलेल्या बालाकोट एअरस्ट्राइकमध्ये 300 दहशतवादी ठार; पाकिस्तानच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याचा खुलासा)

याबाबत खैबर पख्तूनख्वा सरकारचे प्रवक्ते कामरान बंगाश म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे यासाठी ड्रेस कोड लागू केला गेला आहे. विद्यापीठांना ड्रेस कोडबाबत स्वतःची धोरणे बनविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. ते पुढे म्हणाले, यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील ड्रेस स्पर्धा संपेल, गरीब विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मदत होईल. यामुळे त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल.