Vladimir Putin | (Photo Credits: Facebook)

युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान (Ukraine War) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की थोड्या काळासाठी पुतिन त्यांचे पद सोडू शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातील क्रेमलिनमधील सूत्रांनी सांगितले की, व्लादिमीर पुतिन कोलन कॅन्सर आणि पार्किन्सन्स आजाराने ग्रस्त आहेत. 69 वर्षीय रशियन राष्ट्राध्यक्षांवर कोलन कॅन्सरची शस्त्रक्रिया होणार आहे. अशा स्थितीत त्यांचे खास सहयोगी आणि कट्टर गुप्तहेर प्रमुख निकोलाई पात्रुशेव हे त्यांच्या जागी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळतील.

70 वर्षीय निकोलाई पात्रुशेव हे युक्रेनविरुद्धच्या युद्धाच्या रणनीतीतील प्रमुख व्यक्ती मानले जातात. युक्रेनचे सरकार नव-नाझीवादाने भरलेले आहे आणि युक्रेनमध्ये रशियाविरुद्ध मोठे षड्यंत्र रचले जात आहेत हे त्यांनीच रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना पटवून दिले होते, असा दावा सूत्रांनी केला आहे. रिपोर्ट्सनुसार, पुतिन लवकरच त्यांच्या वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया सुरू करणार आहेत. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, त्यांच्यावर कॅन्सरसाठी तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे.

ऑपरेशननंतर जोपर्यंत पुतीन यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नाही, तोपर्यंत त्यांना सरकार चालवता येणार नाही. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की पुतिन यांनी त्यांचे विश्वासू पात्रुशेव यांच्याशी अनेक तास चर्चा केली व या चर्चेनंतर त्यांनी ऑपरेशन दरम्यान पात्रुशेव यांच्याकडे सत्ता सोपवण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु अद्याप त्याची घोषणा झालेली नाही. (हेही वाचा: Emmanuel Macron दुसर्‍यांदा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी; भारताचे पंतप्रधान Narendra Modi यांच्याकडून अभिनंदन)

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन दीर्घकाळापासून आजारी असून, कर्करोग आणि पार्किन्सन आजाराने त्रस्त आहेत. याआधीच त्यांचे ऑपरेशन न झाल्यामुळे या दोन्ही आजारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पुतीन यांच्यावर कधी ऑपरेशन होणार याचा निर्णय अद्याप झालेला नसून, 9 मेपूर्वी ऑपरेशनचा विचार करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 9 मे हा रशियाचा राष्ट्रीय विजय दिवस आहे, त्याच दिवशी रशियाने हिटलरच्या नाझी सैन्यावर विजय मिळवला होता. अशाप्रकारे क्रेमलिनमधील व्यक्तीच्या दाव्यानुसार, व्लादिमीर पुतीन यांना काही दिवसांसाठी युक्रेनमधील युद्धाचे नियंत्रण सोडण्यास भाग पाडले जाऊ शकते.