Russia Airlines (S7) Co-Owner Natalia Fileva | (File Photo)

जगातील सर्वाधिक श्रीमंत महिलांपैकी एक आणि जगप्रसिद्ध एस 7 एअरलाईन्स (S7 Airlines) कंपनीच्या सहसंस्थापक असलेल्या नतालिया फिलेवा (Natalia Fileva) यांचे विमान अपघातात निधन झाले. त्या 55 वर्षांच्या होत्या. दक्षिण-पश्चिम जर्मनी (Germany) यथील एजेलबाश शहराजवळ त्यांच्या विमानाला अपघात घडला. या विमानाची आसनक्षमता पायलट आणि 6 प्रवासी इतकी होती. दुर्घटना घडली तेव्हा नतालिया फिलेवा यांच्यासोबत त्यांचे वडीलही होते. त्या त्यांच्या वडीलांवरील वैद्यकीय उपचारांसाठी फ्रान्सहून जर्मनीला निघाल्या होत्या. दरम्यान, त्यांच्यावर काळाने झडप घातली. नतालिया यांना रशियातील उद्योग क्षेत्रातील 'आयर्न लेडी' म्हणूनही ओळखले जात असे.

जर्मन उच्चाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, वळण घेत असताना विमानचालकाचे विमानावरील आपले नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. अपघातासंबंधी विस्तारीत बातमी येणे अद्याप बाकी आहे. अपघाताबाबत माहिती कळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. तेव्हा यात दोन व्यक्तिंचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली.

नतालिया आणि त्यांचे पती व्लादिस्लाव फिलेवा हे सायबेरिया एअरलाईन्स ( S7 Airlines) चे भागीदार होते. नतालिया यांचे वार्षिक उत्पन्न 60 कोटी डॉलर्स ( भारतीय रुपयांत 4154 कोटी रुपये) इतके होते. व्लादिस्लाव आणि नतालिया यांना चार मुले आहेत. यातील एका दत्तक घेतलेल्या मुलीचाही समावेश आहे. रशीयन नागरी उड्डाण उद्येग क्षेत्रात प्रवाशांना दिलेल्या सोईसूविधा आणि सुरक्षा याबाबत प्रवाशांच्या मनात विश्वासार्हता आणि चोक व्यवहार केल्यामुळे त्यांना 'आयर्न लेडी' म्हणून ओळकले जात असे. (हेही वाचा, विमान अपघात : रनवेऐवजी थेट पाण्यात घुसलं विमान, 47 प्रवाशांना बचावण्यात यश)

एस 7 नावाने ओळखली जात असलेली सायबेरिया एअरलाईन्स ही कंपनी रशियातील दुसऱ्या क्रमांकाची एअरलाईन्स कंपनी होती. या कंपनीकडे 96 विमाने होती. जगभरातील 26 देशांच्या 181 शहरांमध्ये ही कंपनी सेवा देत असे. एयरोफ्लोत या रशियातील सर्वात मोठ्या विमान कंपनीची एस 7 ही एक प्रमख स्पर्धक होती.