Pope Francis, Donald Trump, Kamala Harris | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी दोन्ही उमेदवारांवर जोरदार टीका केली आहे. पोप यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या स्थलांतरितविरोधी भूमिकेचा आणि कमला हॅरिस (Kamala Harris) यांच्या गर्भपाताच्या अधिकाराच्या समर्थनाचा उल्लेख 'जीवन विरोधी' म्हणून केला. 12 दिवसांच्या आशिया दौऱ्यानंतर रोमला परतत असताना विमानामध्ये पत्रकारांशी साधलेल्या संवादादरम्यान बोलत असताना पोप यांनी ही टीप्पणी केली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरावर कठोर कारवाई करण्याचे वचन दिले आहे आणि स्थलांतरितांना देशाबाहेर पाठवण्याच्या त्यांच्या योजनांबद्दल घोषणा केली आहे. दुसऱ्या बाजूला, कमला हॅरिस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 2022 च्या निर्णयाबाबत बोलताना गर्भपाताचे अधिकार पुनर्संचयित करण्याचे वचन दिले आहे.

दोन्ही नेत्यांची भूमिका म्हणजे गंभीर पाप- पोप

पोप फ्रान्सिस यांनी म्हटले आहे की, कमला हॅरीस आणि डोनाल्ड ट्रम्प या दोन्ही नेत्यांमध्ये गर्भपात आणि स्थलांतरितांबद्दल करुणेचा अभाव दिसतो. स्थलांतरितांना दूर पाठवणे किंवा त्यांना काम करण्याची परवानगी न देणे हे एक गंभीर पाप आहे, असे ते म्हणाले. पोप यांनी दोन्ही मुद्द्यांना जीवन आणि मानवी सन्मानाचे उल्लंघन म्हणून वर्णन केले आणि आगामी नोव्हेंबरच्या निवडणुकीत लोकांना त्यांच्या विवेकबुद्धीचे पालन करण्याचे आवाहन केले. (हेही वाचा, Pope Francis Warns Against Populism: लोकशाहीचे आरोग्य चांगले नाही, पोप फ्रान्सिस यांचा इशारा; लोकानुनय मतप्रणालीवर जोरदार टीका)

डोनाल्ड ट्रम्प: हे अमेरिकेतील एक आघाडीचे राजकारणी आहेत. ते रिपब्लिक पार्टीचे नेतृत्व करतात आणि या आधीही राष्ट्राध्यक्ष राहिले आहेत. शिवाय ते एक यशस्वी व्यवसायिक आहेत. आक्रमक शैली आणि वादग्रस्त विधाने यांसाठी ते जगभरामध्ये विशेष प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावरुन व्यक्त केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे त्यांना तत्कालीन ट्विटर (आताचे एक्स) या मंचाने निलंबीत केले होते. प्रदीर्घ काळ ते ट्विटरवर निलंबनाच्या कारवाईमुळे सक्रीय नव्हते. दरम्यान, एलन मस्क यांच्याकडे एक्सची सूत्रे आल्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. परिणामी ट्रम्प पुन्हा एकदा एक्सवर सक्रीय झाले आहेत. अलिकडेच मस्क आणि ट्रम्प यांची एक एक्सस्पेसही जोरदार चर्चेत राहिली. त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून 1968 मध्ये अर्थशास्त्रात विज्ञान पदवी प्राप्त केली आहे. (हेही वाचा, Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत निवडून आल्यास कॅबिनेटमध्ये इलॉन मस्क यांना स्थान)

कमला हॅरीस: या देखील अमेरिकन राजकारणी आहेत. पेशाने त्या वकील आहेत आणि युनायटेड स्टेट्सच्या 49 व्या आणि वर्तमान उपाध्यक्ष आहेत. सन 2021 मध्ये त्यांनी उपाध्यक्षपद ग्रहण केले. त्या टेमेक्रॅटीक पक्षाचे नेतृत्व करतात. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना अध्यक्ष करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. उल्लेखनीय असे की, त्या भारतीय वंशाच्या राजकारणी आहेत.