
Political Conflict In Bangladesh: बांगलादेशातील राजकारण पुन्हा एकदा उफाळून आले असून गोपाळगंजमध्ये शेख हसीनाच्या (Sheikh Hasina) समर्थक आणि अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस (Mohammad Yunus) समर्थित राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्षामुळे तणाव निर्माण झाला आहे. या हिंसक संघर्षात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू, तर नऊ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. गोपालगंजमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाताच सैनिकी टँक रस्त्यावर आणण्यात आले असून कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. परिसरात बॉर्डर गार्ड बांगलादेशचे 200 जवान तैनात करण्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, 14 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी शाखेने गोपाळगंजमध्ये रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीदरम्यान शेख हसीनाच्या वडिलांवर आणि बांगलादेशचे जनक शेख मुजीबुर रहमान यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावर संतप्त झालेल्या अवामी लीगच्या विद्यार्थी संघटनेने (बांगलादेश छात्र लीग) रॅलीवर हल्ला चढवला. दोन्ही गटांमध्ये तुफान संघर्ष झाला. पोलिसांनी जमावावर गोळीबार करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु वातावरण चिघळत गेलं. या संघर्षात दिप्तो साहा (25), रमजान काझी (18) आणि सोहेल मोल्ला (41) यांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. (हेही वाचा - Lexington Church Firing: केंटकीमधील चर्चमध्ये गोळीबार, दोन महिलांचा मृत्यू, संशयित ठार)
दरम्यान, अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'शांततामय रॅलीवर हल्ला करून विद्यार्थ्यांचे मूलभूत हक्क पायदळी तुडवण्यात आले आहेत. हिंसा करणाऱ्यांना जबाबदार धरले जाईल.' दुसरीकडे, अवामी लीगने युनूस सरकारवर त्यांच्या कार्यकर्त्यांवर सायशस्त्र हल्ला केल्याचा आरोप केला आहे.
शेख हसीनाला हटवण्यात सहभागी असलेल्या गटाने आता राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला आहे. युनूस सरकारमध्ये सल्लागार असलेल्या नाहिद इस्लाम यांनी 28 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेसला बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण बांगलादेशात निदर्शनांची मोहीम राबवत आहे. बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचे वडिलोपार्जित घर गोपाळगंज येथे आहे. गोपाळगंज येथे बंग बंधू शेख मुजीबुर रहमान यांचे स्मारक देखील आहे. रॅली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थ्यांनी शेख मुजीबुर रहमान यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. घोषणाबाजीनंतर हसीनाच्या समर्थकांशी संघर्ष सुरू झाला. काही वेळातच गोंधळ वाढला. पोलिसांनी प्रथम निदर्शकांवर गोळीबार केला. त्यानंतरही परिस्थिती सुधारली नाही तेव्हा टँक आणण्यात आले. शेख हसीनाच्या समर्थकांना अटक करण्यात आली.