Imran Khan - Osama Bin Laden (Photo Credits: PTI/Wikimedia Commons)

दहशतवादाला (Terrorism) थारा देणाऱ्या पाकिस्तानची (Pakistan) याच मुद्द्यावर अनेकवेळा पोलखोल झाली आहे. दहशतवाद्यांविषयीची पाकिस्तानची सहानुभूतीही अनेकदा समोर आली आहे. आता पुन्हा एकदा हीच गोष्ट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Prime Minister Imran Khan) यांनी दिलेल्या निवेदनातून स्पष्ट झाली आहे. इम्रान खान यांनी, 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत जबरदस्त दहशतवादी हल्ल्याचा कट रचलेल्या अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन (Osama bin Laden) याला 'शहीद' (Martyr) म्हणून संबोधले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधात कोणतीही कारवाई न केल्याचा आणि दहशतवादी संघटनांना आश्रय दिल्याचा आरोप पाकिस्तानवर होत असताना, खान यांनी हे विधान केले आहे.

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये इम्रान खान बोलत होते, जेव्हा त्यांनी ओसामाला शहीद म्हटले. इम्रान खानच्या भाषणाचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये ते म्हणतात, "... ही गोष्ट आमच्यासाठी लाजिरवाणी होती... अमेरिकन आम्हाला काही न सांगता आले आणि त्यांनी एबटाबादमध्ये ओसामा बिन लादेनला ठार मारले... त्यांना शहीद केले...’. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या संबोधनादरम्यान इम्रान खान यांनी दहशतवादाविरोधात अमेरिकेबरोबर असलेल्या पाकिस्तानच्या युतीबाबतही प्रश्न उपस्थित केले.

पहा व्हिडिओ -

ते पुढे म्हणतात, ‘यानंतर पाकिस्तानने काय साध्य केले? पाकिस्तानला संपूर्ण जगाने खूप सुनवले आणि देशाला मोठा लाजीरवाणा प्रसंग सहन करावा लागला.’ दहशतवादाविरूद्धच्या या युद्धात सुमारे 70 हजार पाकिस्तानी ठार झाल्याचेही त्यांनी सांगितले, तसेच दहशतवादाविरूद्धच्या युद्धात पाकिस्तानने अमेरिकेला साथ द्यायला नको होती, असेही ते म्हणाले. इम्रान खान यांनी असे वादग्रस्त विधान प्रथमच केले नाही, तर ओसामाबद्दलची त्यांची आत्मीयता याधीही दिसून आली आहे. त्यांनी अनेक वेळा त्याला दहशतवादी संबोधण्यास नकार दिला आहे. अशाप्रकारे पाकिस्तानने आता जाहीरपणे कबूल केले आहे की, पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देते आणि जेव्हा ते मरतात तेव्हा त्यांना ‘शहीद’ असा दर्जा दिला जातो. (हेही वाचा: भारताला मोठे यश, मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणा याला लॉस एंजिल्स मधून अटक)

दरम्यान, ओसामा बिन लादेनला पाकिस्तानच्या एबटाबादमध्ये ठार मारण्यात आले होते. अमेरिकन नेव्ही सील्स संघाने 9/11 च्या घटनेनंतर सुमारे 10 वर्षांनंतर, 2 मे 2011 रोजी ही कामगिरी केली. 2001 मध्ये अमेरिकेत झालेल्या दहशतवादी घटनेबरोबरच लादेनवर इतर अनेक दहशतवादी घटना घडवून आणण्याचा किंवा कट रचल्याचा आरोप होता.