पाकिस्तानी मुलींची तस्करी-प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित-संपादित प्रतिमा)

पाकिस्तानी मुलींना फसवून त्यांचे खोटे लग्न लावून, चीनमध्ये घेऊन जाऊन त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले जाण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याबाबतीत नुकतेच एका महिलेसह 10 चीनी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर पाकिस्तानी मुलींच्या तस्कीरीचे हे फार मोठे रॅकेट असून, याची पाळेमुळे अतिशय खोलवर रुजली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानी गरीब कुटुंबांना 50 हजार ते 1 लाख रुपये दिल्यावर अशा मुली सहज उपलब्ध होतात. यामध्ये पाकिस्तानी ख्रिश्चन मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.

या गोष्टीची दुसरी बाजू म्हणजे, चीनमध्ये फक्त एकच मुल होऊ द्यायचा नियम आहे, त्यामुळे लिंग गुणोत्तर यामध्ये फार तफावत आहे. ज्या काही लग्नाळू मुली आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण करता करता चीनी तरुणाच्या नाकीनऊ येत आहे. परिणामी बाहेरील देशातून लग्न करून पत्नी घेऊन येणे हे चीनी तरुणांसाठी सोपे आहे. यासाठी पाकिस्तानसारख्या गरीब देशाची निवड केली जाते. यासाठी पाकिस्तानमध्ये एजंट्स आहेत, जे अशा तरुणांना गरीब पाकिस्तानी तरुणींशी ओळख करून देतात.

(हेही वाचा: प्रसिद्ध अभिनेत्री भानुप्रिया हिच्या घरी मिळाल्या 3 अल्पवयीन मुली, तस्करी केल्याचा संशय)

पुढे जाऊन यातील बरीच लग्ने तुटतात, या मुली चीनमधून परत आपल्या घरी येतात. मात्र एक लग्न तुटल्यावर पुन्हा दुसऱ्या लग्नाचे आमिष दाखवले जाते. अशा लग्नामुळे स्वस्तात नवरी मिळते, तर काही ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी नवीन मुली मिळतात. 2013 ते 2017 या काळात 91 हजार चिनी तरुणांना पाकिस्तानचा व्हिसा दिला गेला आहे. मागच्या दोन वर्षांत 750 ते 1000 पाकिस्तानी मुलींनी चिनी मुलांशी लग्न केली आहेत. याबाबत एफआयएने तपास सुरु केला असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.