प्रसिद्ध अभिनेत्री भानुप्रिया हिच्या घरी मिळाल्या 3 अल्पवयीन मुली, तस्करी केल्याचा संशय
अभिनेत्री भानुप्रिया (फोटो सौजन्य-ट्वीटर)

दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री भानुप्रिया (Bhanupriya) हिच्या घरी तीन अल्पवयीन मुली मिळाल्याने खळबळ माजली आहे. त्यामधील एका मुलीच्या आईने चाईल्ड लाईनच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देत तिच्या चेन्नई येथील घरावर पोलिसांनी छापे मारले. त्यावेळी पोलिसांना भानुप्रिया हिच्या घरी 3 अल्पवयीन मुली आढळल्या आहेत. या प्रकरणी भानुप्रिया हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भानुप्रिया हिच्याकडून मुलीवर आणि तिच्या आईवर चोरीचा आळ घेतला आहे.

अल्पवयीन मुलीच्या आईने आंध्रप्रदेशातील समालकोट येथे पोलिसात याबाबत तक्रार केली. या पीडित मुलीच्या आईने अभिनेत्री भानुप्रिया हिने जबरदस्तीने मुलीला तिच्या घरी कामासाठी ठेवले असल्याचा आरोप केला आहे. तसेच काम करुन घेतल्यानंतर ही एक दमडी देऊ केली नाही. एका नोकरी देणाऱ्या एजेंटने 10 हजार रुपयांची नोकरी मिळवून देतो असे आश्वासन दिले होते. त्यानुसार पीडित मुलीच्या आईने पोलिसांना असे सांगितले की, काही दिवासांपूर्वी मुलीने एका व्यक्तीला फोन केला होता. तर अभिनेत्रीच्या घरी तिला मारहाण आणि लैंगिक शोषण करण्यात आले असल्याचे ती फोनवरुन सांगत होती. त्यानंतर 18 जानेवारी रोजी मुलीला भेटण्यासाठी चेन्नईला गेली त्यावेळी अभिनेत्रीच्या घराबाहेर मला अडवण्यात आले असल्याचे आईने तिने म्हटले आहे.

भानुप्रिया ही तेलगु, तमिळ आणि मल्याळम चित्रपटात काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तर अभिनेत्रीच्या घरी छापे मारल्यानंतर पीडित मुलीसह अन्य दोन मुलींची सुटका करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.