Pakistan Shocker: पैशांअभावी मुलीवर होऊ शकले नाहीत उपचार; वडिलांनी आपल्या 15 दिवसांच्या चिमुरडीला जमिनीत जिवंत गाडले
Baby (File Image)

पाकिस्तानच्या (Pakistan) सिंध प्रांतात एका व्यक्तीने आपल्या 15 दिवसांच्या निष्पाप मुलीला जिवंत पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहवालानुसार, मुलीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने हतबल पित्याने आपल्या मुलीला जिवंत पुरले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने ही माहिती दिली. पाकिस्तानच्या एआरवाय न्यूज या न्यूज पोर्टलच्या वृत्तानुसार, ही घटना सिंधमधील थरुशाह येथे घडली. आरोपी पित्याचे नाव तय्यब असे असून, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. आरोपीच्या कबुलीनंतर आता पुढील कारवाई सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कबर खोदून मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात येणार आहे. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक तपासणीनंतर पुढील तपास करण्यात येईल. आर्थिक अडचणीचे कारण देत तय्यबने हे घृणास्पद कृत्य केल्याची कबुली दिल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

तय्यब म्हणाला की, आपण आपल्या नवजात मुलीवर उपचार करू शकलो नाही. त्याने पैशाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला पण यश मिळू शकले नाही. अशा स्थितीत तय्यबने नवजात बाळाला गोणीत ठेवून जमिनीत गाडले. तय्यबविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याची रवानगी कारागृहात केली आहे. (हेही वाचा: Pakistan Stock Exchange Fire: पाकिस्तानच्या कराची येथील स्टॉक एक्सचेंज इमारतीला आग, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण)

दरम्यान, आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेला शेजारी देश पाकिस्तानची स्थिती बिकट होत चालली आहे. एप्रिलमध्ये जागतिक बँकेच्या अहवालात याबाबत इशारा देण्यात आला आहे. देशातील आणखी एक कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली जाऊ शकतात, असे म्हटले आहे. आधीच 9.8 कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. जागतिक बँकेने वाढती महागाई आणि अत्यंत कमी आर्थिक विकास दर ही कारणे दिली आहेत. अहवालात म्हटले आहे की, गरीब आणि असुरक्षित लोकांना वाढलेल्या कृषी उत्पादनाचा फायदा होण्याची शक्यता आहे, परंतु सतत उच्च चलनवाढ आणि बांधकाम, व्यापार आणि वाहतूक यासारख्या क्षेत्रातील मर्यादित वेतन वाढीचा फटकाही बसू शकतो.