शेजारील देश पाकिस्तानमध्ये (Pakistan) दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. या वाढत्या महागाईमुळे जनतेला लहान-सहान गोष्टींसाठी खूप जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. याआधी अनेकवेळा महागाईने त्रस्त लोकांना दिलासा देण्याऐवजी तेथील नेत्यांनी लोकांना विचित्र सल्ले दिले आहेत. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तानी जनतेला कमी चपात्या खाण्याचा सल्ला दिला होता. आता नवाज शरीफच्या मार्गावर चालत पाकिस्तानच्या विद्यमान इम्रान सरकारच्या मंत्र्यानेही लोकांना कमी खाण्याचा सल्ला दिला आहे.
पाकिस्तानच्या इम्रान सरकारमधील पीओके आणि गिलगिट-बाल्टिस्तान प्रकरणांचे मंत्री अली अमीन गंडापुर (Ali Amin Gandapur) यांनी लोकांना 9 घास कमी खाण्याचा सल्ला दिला आहे. अलीकडेच एका सभेला संबोधित करताना, लोकांना महागाईचा सामना करण्यासाठी एक विचित्र सल्ला देत मंत्र्यांनी त्यांना कमी साखर आणि कमी चपात्या खाण्यास सांगितले. अमीन गंडापूर म्हणाले की, 'मी चहामध्ये शंभर दाणे साखर घालतो, मात्र कधी जर मी नऊ दाणे कमी घातले तर चहाची गोडी कमी होईल का? आपण खूप कमकुवत झालो आहोत. आपण आपल्या देशासाठी एवढा त्याग करू शकत नाही?’
गंडापुर पुढे म्हणाले की, जर नऊ टक्के महागाई असेल, तर 100 घासामधील 9 घास कमी खाल्ले तर काही बिघडणार आहे? लोकांनी तर पोटावर दगड बांधून युद्धे लढली आहेत आणि महासत्तांना खाली खेचले आहे. आम्हाला हे ठरवायचे आहे की, आम्हाला मुलांना असा पाकिस्तान द्यायचा आहे जिथे मूल जन्माला आल्यावर त्याच्यावर कुठले कर्ज नसेल. (हेही वाचा: पाकिस्तानमध्ये सक्रीय आहेत तब्बल 12 दहशतवादी संघटना; अनेकांचे लक्ष्य आहे भारत, Report मधून धक्कादायक खुलासा)
दरम्यान, 1998, मध्ये जेव्हा पाकिस्तानने अणुचाचणी घेतली होती तेव्हा तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी टीव्ही आणि रेडिओवर जनतेला संबोधित करताना याविषयी म्हटले होते की, ‘तुमची कंबर कसा आणि फक्त एकदाच जेवण घ्या. या संकटामध्ये मीही तुमच्यासोबत असेन.’