Madrasa | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: ANI)

सध्या भारतात गे आणि लेस्बियनचा (Gay and Lesbian) मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. भारतातील एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुदायाचे लोक त्यांच्या हक्कांसाठी कोर्टात लढा देत आहेत. आता पाकिस्तानच्या (Pakistan) एका मौलानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मौलाना पाकिस्तानातील मशिदी-मदरशांवर भाष्य करत आहेत. ते म्हणतात की, मदरशा हे समलैंगिकांची निर्मिती करणारा उद्योग बनला आहे. या उद्योगामुळे केवळ समलैंगिकांचीच निर्मिती होत नाही, तर त्यांनी अशी व्यवस्था केली आहे की, अशा प्रकारचे मदरशा प्रत्येक गाव, प्रत्येक शहर आणि प्रत्येक रस्त्यावर 200 यार्डांच्या आत उभारले गेले आहेत.

पाकिस्तान अनटोल्ड या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मौलाना सध्याच्या मदरशांवर अतिशय कठोरपणे भाष्य करत आहेत. मदरशांच्या नावाखाली आम्ही समलिंगी लोकांची निर्मिती करण्याचा उद्योग उघडला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

ते म्हणतात की, शहरात तसेच गावातही हेच चालू आहे. एक मदरशा वर्षाला 70 हजार समलैंगिक मुले तयार करते. हा मुद्दा इतका साधा नाही की तो विनोद करून संपवता येईल. ही व्यवस्था संपवली पाहिजे, कारण या गोष्टींनी धर्म चालत नाही. यासोबतच त्यांनी पालकांना आपल्या मुलांना मशिदी आणि मदरशांमध्ये शिक्षणासाठी पाठवू नका, असा सल्लाही दिला आहे. मौलाना यांनी पालकांना त्यांच्या मुलांना मॅट्रिक (दहावी) नंतरच बाहेर पाठवण्याचा सल्ला देत, त्यापूर्वी मुलांना घरीच शिकवले पाहिजे, असे सांगितले. (हेही वाचा: मुंबईमध्ये पहिल्यांदाच मोठ्या 'गे सेक्स रॅकेट'चा पर्दाफाश; तरुण मुले पुरवण्याचे आश्वासन देत अनेकांना लुबाडले, तिघांना अटक)

मुलाने शिक्षण घेतले नाही तर हरकत नाही, पण त्याला मदरशांच्या हवाली करू नये, असे ते म्हणाले. अलीकडच्या काही दिवसांत पाकिस्तानमध्ये अनेक मदरशांचे शिक्षक, मौलवींना अटक करण्यात आली आहे, ज्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप आहे. गेल्या वर्षी पंजाब प्रांतात 10 अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका मौलवीला अटक करण्यात आली होती.