Gay Sex Racket: मुंबईमध्ये पहिल्यांदाच मोठ्या 'गे सेक्स रॅकेट'चा पर्दाफाश; तरुण मुले पुरवण्याचे आश्वासन देत अनेकांना लुबाडले, तिघांना अटक
Gay Sex (प्रातिनिधिक-संग्रहित-संपादित प्रतिमा)

मुंबईत (Mumbai) पहिल्यांदाच 'गे सेक्स' रॅकेटचा (Gay Sex Racket) पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आहे. ही टोळी गेल्या अनेक महिन्यांपासून ऑनलाइन गे डेटिंग अॅप 'ग्राइंडर'च्या (Gay Dating App Grindr) माध्यमातून हे सेक्स रॅकेट चालवत होती. त्यांचे अनेक ग्राहक हायप्रोफाईल लोक असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या टोळीच्या अटकेनंतर पोलीस आता त्यांच्या ग्राहकांच्याही मुसक्या आवळू शकतात. इरफान फुरकान खान (26), अहमद फारुकी शेख (24) आणि इम्रान शफीक शेख (24) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणातील अन्य दोन आरोपी फरार आहेत व पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगितले की, ही टोळी ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून 'गे' लोकांशी संपर्क साधायची आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन आपल्या मालवणी येथील ऑफिसमध्ये सेक्स करण्यासाठी तरुण मुले पुरवण्याचे आश्वासन द्यायची.

असा झाला भांडाफोड-

आरोपींनी एका कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाला गे डेटिंग अॅपवर सेक्सचे आमिष दाखवले होते. त्याच्याकडून तासाला एक हजार रुपयांची मागणी करण्यात आली. दोघांमध्ये डील झाल्यावर तरुणाला मालवणी येथे एका ठिकाणी बोलावण्यात आले. पीडित तरुण आरोपीने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचला. त्यावेळी खान त्याचा सेक्स पार्टनर म्हणून येणार होता. परंतु काही कामानिमित्त तो व्यस्त असल्याने त्याने आपल्या दुसऱ्या मित्राला तिथे जाण्यास सांगितले. परंतु तो मुलगाही बिझी होता.

या दरम्यान, पिडीत मुलगा त्यांच्या ऑफिसपर्यंत पोहोचला होता. थोड्यावेळाने तिथे खानसह 4 तरुण आले व त्या चौघांनीही पिडीत तरुणासोबत सेक्सची इच्छा व्यक्त केली. या तरुणाने त्यासाठी नकार दिल्याने या चार तरुणांनी त्याला बेदम मारहाण करून त्याचा फोन, पाकीट आणि काही दागिने हिसकावले. एवढेच नाही या मुलाचे कपडे उतरवून त्याचा व्हिडीओदेखील बनवला व त्याबदल्यात पैशांची मागणी केली. (हेही वाचा: Mumbai Road Accident: WEH वर बाईकला सिमेंट मिक्सरने धडक दिल्याने 16 महिन्यांच्या चिमुकलीसह आईचा मृत्यू)

तरुणाकडे त्यावेळी पैसे नव्हते त्यामुळे तो घरून पैसे आणून देतो असे कारण सांगून तिथून निघाला. मात्र ही टोळीही त्याच्यासोबत निघाली व पैशांची वाट बघत त्याच्या घराजवळ उभी राहिली होती. तरुणाने घरी येऊन कुटुबियांना सर्व माहिती दिली व त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शेखर भालेराव आणि हसन मुलाणी यांनी टोळीचा शोध घेत, मुख्य सूत्रधारासह तीन आरोपींना जेरबंद केले. दोन आरोपी अजूनही फरार आहेत, असे अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले. आरोपींची कार्यपद्धती पाहता या टोळीचे आणखी अनेक लोक बळी ठरल्याची भीती व्यक्त होत आहे. पोलिसांनी सर्व आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. अटक आरोपींना सोमवारी बोरिवली महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.