दाऊद इब्राहिम, हाफिज सईद, मसूद अजहर यांच्यावर प्रतिबंद; FATF 'ग्रे लिस्ट' मधून बाहेर येण्यासाठी पाकिस्तानची धडपड
Pakistan imposes more restrictions on 88 leaders and members of terrorist groups | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख सूत्रधार दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) हा पाकिस्तानातच असल्याची माहिती दस्तुरखूद्द पाकिस्तान (Pakistan) सरकारमुळेच पुढे आली आहे. पाकिस्तानने बंदी असलेल्या 88 दहशतवादी संघटना आणि दाऊद इब्राहीम, हाफिज सईद (Hafiz Saeed), मसूद अजहर (Masood Azhar) यांच्या संपत्तीवर प्रतिबंध लावले आहेत, असे वृत्त पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिले आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या संपत्तीवर भलेही प्रतिबंद लावले खरे. मात्र, दाऊद आमच्याकडे नाहीच असे वारंवार सांगणारा पाकिस्तान पुन्हा एकदा उघडा पडला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी संघटनांना पुरवल्या जाणाऱ्या आर्थिक रसदीवर बारीक लक्ष ठेवणाऱ्या एफएटीएफ (Financial Action Task Force) च्या 'ग्रे लिस्ट' मधून बाहेर येण्यासाठी पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करत आहे. हे प्रतिबंद म्हणजे त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले जात आहे.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान सरकारने दहशतवादी संघटना आणि दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पॅरीस एफएटीएफने जून 2018 मध्ये पाकिस्तानला 'ग्रे लिस्ट' मध्ये टाकले होते. तसेच, इस्लामाबादला 2019 च्या शेवटपर्यंत कारवाई करण्यासाठी योजना तयार करण्यास सांगितले होते. मात्र, कोविड 19 संकटामुळे या कारवाईला मुदतवाढ देण्यात आली होती.

पाकिस्तान सरकारने 18 ऑगस्टला दोन अधिसूचना जारी केल्या. त्यात 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात उद दावा या संघटनेचा हाफीस सईद, जैश ए महोम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम या सर्वांवर प्रतिबंद लावण्याची घोषणा केली होती. 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊद इब्रहीम हा भारताविरोधातील एक प्रमुख दहशतवादी म्हणून पुढे आला आहे. (हेही वाचा, पाकिस्तानचे रेल्वे मंत्री Sheikh Rasheed यांची भारताला धमकी; 'आता भारतासोबत पारंपरिक युद्ध नाही, तर होणार अणुबॉम्ब हल्ला, आमची शस्त्रे तयार')

पाकिस्तानी वृत्तपत्र द न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान सरकारने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) जारी केलेल्या नव्या सूचीचे अनुसरण करत दहशतवादाशी संबंधीत 88 संघटना आणि सदस्यांवर प्रतिबंद लावले आहेत. यात जमात-उद-दावा, जैश-ए-मोहम्मद, तालिबान, दाएश, हक्कानी समूह, अलकायदा आणि इतरही काही छोट्या दहशतवादी संघटनांचा समावेश आहे. वृत्तानुसार सरकारने या संघटना आणि व्यक्तींची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याचे तसेच बँक खातीही गोठविण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये प्रतिबंद लावण्यात आलेल्या यादीत दाऊद इब्राहिम, हाफीज सईद, अजहर, मुल्ला फजलुल्ला (उर्फ मुल्ला रेडियो), जकीउर रहमान लखवी, मुहम्मद यह्या मुजाहिद, अब्दुल हकीम मुराद, नूर वली महसूद, उजबेकिस्तान लिबरेशन मूव्हमेंट चा फजल रहीम शाह, तालिबान नेता जलालुद्दीन हक्कानी, खलील अहमद हक्कानी, यह्या हक्कानी, दाऊद इब्राहीम आणि त्याच्या हस्तकांचा समावेश आहे.