याधी पाकिस्तानमधून (Pakistan) अनेक चित्र-विचित्र बातम्या समोर आल्या आहेत. आता पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांचे विशेष सहाय्यक हनीफ अब्बासी (Hanif Abbasi) एक चमत्कारिक घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, जो कोणी माजी गृहमंत्री शेख रशीद (Sheikh Rashid) यांच्या डोक्यावरील विग (Wig) काढून दाखवेल त्याला 50,000 पाकिस्तानी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. त्यांचा हा अजब प्रस्ताव पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
रावळपिंडी येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना, पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) नेते हनीफ अब्बासी म्हणाले की, सौदी अरेबियाच्या मस्जिद-ए-नबवीमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या शिष्टमंडळाचा अपमान करण्याच्या नियोजनात, माजी पंतप्रधान इम्रान खान, शेख रशीद आणि त्यांचा पुतण्या सामील होते. द न्यूज इंटरनॅशनलच्या वृत्तानुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या घटनेचा एक व्हायरल व्हिडिओ फिरत आहे.
अहवालानुसार, या व्हायरल व्हिडिओमध्ये शिष्टमंडळाला मस्जिद-ए-नबवीकडे जाताना पाहून शेकडो लोक ‘चोर चोर’ अशा घोषणा देताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये माहिती मंत्री मरियम औरंगजेब आणि नॅशनल असेंब्लीचे सदस्य शाहजैन बुगती इतर सदस्यांसह दिसत आहेत. गेल्या गुरुवारी, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य मदिना येथील हजरत मशिदीत पोहोचले, तेव्हा काही इम्रान खान समर्थक यात्रेकरूंनी शरीफ यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली.
या प्रकारानंतर पाच पाकिस्तानी यात्रेकरूंना अटक केल्याचा दावाही मदिना पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात इम्रान खान, शेख रशीद यांच्यासह 150 जणांनाही आरोपी ठरवण्यात आले आहे. हनीफ यांनी ही घटना मस्जिद-ए-नबवीच्या पावित्र्याचे उल्लंघन असल्याचे सांगत, सर्व दोषींना शिक्षा करण्याचे आवाहन केले. (हेही वाचा: रशियाचे राष्ट्राध्यक्ष Vladimir Putin सोडू शकतात त्यांचे पद, होत आहे कॅन्सरची शस्त्रक्रिया; जाणून घ्या 'कोण' सांभाळणार देशाच्या जबाबदाऱ्या)
या घटनेनंतर हनीफ अब्बासी यांनी सांगितले की, ते सर्व राजकीय व्यासपीठांवर शेख रशीद यांच्या विरोधात लढतील. तसेच या माजी मंत्र्यांना जिथे जिथे निवडणूक लढवायची असेल तिथे तिथे त्यांना आव्हान दिले जाईल. यासोबतच जो कोणी माजी गृहमंत्री शेख रशीद यांचा विग काढेल त्याला 50 हजार रुपये मिळतील असेही ते म्हणाले.