Building Washed Away Due Floods in Pakistan. (Photo Credits: Twitter)

पाऊस (Heavy Rains) आणि पुरामुळे (Flood) पाकिस्तानात (Pakistan) हाहाकार माजला आहे. देशातील परिस्थिती इतकी बिघडली आहे की, पुरामुळे सुमारे 1000 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही बिघडलेली परिस्थिती पाहता सरकारने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये पूर आणि अतिवृष्टीमुळे 343 मुलांसह 1 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, 14 जूनपासून सिंध प्रांतात देशात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. त्याचवेळी कराची ते पंजाब, बलुचिस्तानमधील परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे.

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील 70 टक्के भाग पुराच्या तडाख्यात असून सिंध प्रांताला याचा सर्वाधिक फटका बसत आहे. या भीषण पुरामुळे पाकिस्तानात 3 कोटी लोक बेघर झाले आहेत. मुसळधार पावसामुळे पाकिस्तानमध्ये नद्या ओसंडून वाहत आहेत. नद्यांचे पाणी मैल मैल पसरून वस्त्यांमधून जात आहे. अशाप्रकारे पाकिस्तानमध्ये भारताच्या सीमेपासून ते अफगाणिस्तान सीमेपर्यंतच्या भागात पुराने कहर माजवला आहे. पाकिस्तान सरकारच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये असा भीषण पूर गेल्या दशकाभरात कधीच आला नव्हता.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनानुसार, पाकिस्तानमध्ये ऑगस्ट महिन्यात 241 टक्के जास्त पाऊस झाला आहे. सिंध प्रांतातील 23 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचवेळी हवामान बदल मंत्री शेरी रहमान म्हणतात की पाकिस्तानी लष्करासह सार्वजनिक प्रशासन बचाव कार्यात गुंतले आहे. पाकिस्तानच्या माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी परदेशात राहणाऱ्या पाकिस्तानी लोकांना या पुराच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. बाधित लोकांना तात्काळ मदत देण्यासाठी पाकिस्तानला $72.36 बिलियनची गरज असल्याचे सरकारने म्हटले आहे. (हेही वाचा: Ukraine Railway Station Attack: युक्रेनच्या रेल्वे स्टेशनवर रशियाचा हल्ला, 22 जणांचा मृत्यू तर 50 जखमी)

दरम्यान, NDMA नुसार, पुरामुळे 3,161 किमी रस्ते खराब झाले आहेत, 149 पूल वाहून गेले आहेत आणि 6,82,139 घरांचे अंशतः किंवा पूर्ण नुकसान झाले आहे. पुरामुळे जवळपास अर्धा देश पाण्याखाली गेला आहे आणि 110 जिल्ह्यांतील 57 लाखांहून अधिक लोक निवारा आणि अन्नाशिवाय राहिले आहेत.