Imran Khan | (Photo Credits: Facebook)

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (PTI) प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांना 8 दिवसांसाठी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (NAB) च्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. अल-कादिर ट्रस्टशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी एनएबीने इम्रान यांची इस्लामाबाद कोर्टाकडे 14 दिवसांची कोठडी मागितली होती, परंतु त्यांना केवळ 8 दिवसांची कोठडी देण्यात आली. इम्रान खान यांना मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरातून अटक करण्यात आली.

इम्रान खान यांना पाकिस्तान पोलिसांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली आहे. याशिवाय त्यांच्यावर अनेक वेगवेगळी कलमेही लावण्यात आली आहेत.

इम्रान खान यांनी इस्लामाबाद कोर्टात हजेरीदरम्यान सांगितले की, अटक केल्यानंतर त्याचा छळ करण्यात आला. अटकेत असताना त्यांना शौचालयाचा वापरही करू दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इम्रान यांनी दावा केला की, त्यांना हृदयविकाराचा झटका येण्यासाठी इंजेक्शन देखील देण्यात आले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 मे रोजी होईल, जेव्हा इम्रान खान यांची कोठडी संपेल.

इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून झटका बसला आहे. आपल्या अटकेबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत अटकेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

दरम्यान, आपल्या देशाच्या इतिहासाच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात असलेल्या पाकिस्तानला आर्थिक आणि राजकीय अशा दोन्ही आघाड्यांवर पराभवाला सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांकडून देशभरात निदर्शने सुरु आहेत. पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या उग्र रूपामुळे पाकिस्तानातील परिस्थिती अधिकच अनियंत्रित होत आहे. खान यांच्या अटकेविरोधात त्याच्या समर्थकांनी पाकिस्तानात देशव्यापी बंदची घोषणा केली होती. (हेही वाचा: Imran Khan Arrest Video: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक, पाहा व्हिडिओ)

इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानातील पंजाब, बलुचिस्तान आणि खैबर-पख्तुनख्वा प्रांतात भीषण हिंसाचार उसळला आहे. कलम 144 लागू झाल्यानंतरही इम्रानचे समर्थक त्याचे उल्लंघन करताना दिसत होते. लाहोर, पेशावर, क्वेटा, कराची आणि रावळपिंडी येथे मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, मंगळवारी इम्रान खान यांना अटक केल्यानंतर वाहने आणि मोठ्या इमारतींचे बरेच नुकसान झाले.