पाकिस्तान कडून भारताला पुन्हा परमाणू युद्धाची धमकी
शेख रशीद (Photo Credits-Twitter)

पाकिस्तानचे (Pakistan) रेल्वे मंत्री शेख रशीद (Sheikh Rasheed ) यांनी पुन्हा एकदा भारताला परमाणू युद्धाची धमकी दिली आहे. मात्र यावेळी पारंपरिक युद्ध होणार नसून मोठा धमाका होणार असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या एका विधानावरुन असे समोर आले आहे की, पाकिस्तानी सेनेकडून एलओसीच्या जवळ हालचाली आतापासून सुरु करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर सोमवारी एलओसीवरील जवानांच्या संख्येत ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तान कोणत्यातरी आता मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेख रशीद खान यांनी असा दावा केला आहे की, ऑक्टोबर महिन्यात भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्ध होणे हे अटळ आहे. तसेच भारताच्या विरोधात रशीद खान यांनी यापूर्वीही विधाने केली आहेत. त्यामुळेच ते नेहमी चर्चेत राहतात. मात्र अद्याप रशीद खान यांच्या विधानावर पाकिस्तानकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पण सरकारमधील व्यक्तीकडून करण्यात आलेल्या विधानाला कसे चुकीचे ठरवायचे हा सुद्धा मुद्दा येथे उपस्थितीत होतो. भारताला धमकावत त्यांनी असे म्हटले होते की, पाकिस्तानकडे परमाणू बॉम्ब असून ते एका खास टागरेटकडे फेकण्यात येणार आहेत.(FATF यांनी पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकल्यास भविष्य धोक्यात, देशाला करावा लागेल 'या' परिणांमाचा सामना)

5 ऑगस्टला जम्मू-कश्मीर मधून कलम 370 हटवल्यानं पाकिस्तान संतापला आहे. त्यामुळेच पाकिस्तानकडून सीमा नियंत्रण रेषेवर सातत्याने कुरघोडी केल्या जात आहेत. पाकिस्तानच्या याच कारणांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.त्याचसोबत पाकिस्तानला एफएटीएफ (FATF) यांच्याकडून दिलासा मिळाला आहे. त्यानुसार 2020 पर्यंत पाकिस्तानला वेळ दिला असून सध्या ग्रे लिस्टमध्येच राहणार असल्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता पाकिस्तानला शेवटची चेतावणी दिली गेली असून टेरर फंडिंग आणि मनी लॉन्ड्रिंगच्या विरोधात कारवाई करण्यास सांगितले आहे. परंतु वेळ वाढवून देऊन ही पाकिस्तानने कारवाई केली नाही तर येत्या काळात जे परिणाम भोगावे लागतील यासाठी तयार रहावे असे आव्हान देण्यात आले आहे