कोरोना व्हायरसने (Coronavirus) चीन, इटली, अमेरिका, स्पेन, इराण अशा देशांमध्ये थैमान घातल्यानंतर आता रशिया (Russia) देखील या यादीमध्ये समविष्ट झाला आहे. सोमवारी इटली आणि ब्रिटनमधील संसर्गाच्या तुलनेत रशियामध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांचे प्रमाण वाढले. या दोन देशांना मागे टाकत सध्या रशिया कोरोना विषाणूबाबत जगातील तिसरा देश ठरला आहे. अमेरिका व स्पेन या यादीमध्ये अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. रशियामध्ये मागील 24 तासांत कोरोना व्हायरसची 11,656 प्रकरणे समोर आली आहेत व अशाप्रकारे देशातील एकूण संक्रमितांची संख्या 221,344.वर पोहोचली आहे.
रशियामधील अर्ध्याहून अधिक प्रकरणे आणि मृत्यू या उद्रेकाचा केंद्रबिंदू असलेल्या मॉस्कोमधील आहेत. सोमवारी रशियाच्या राजधानीत एका रात्रीत 6,169 नवीन घटनांची नोंद झाली, अशाप्रकारे शहरातील रुग्णांची संख्या 115,909 झाली आहे. देशाच्या कोरोना व्हायरस रिस्पॉन्स सेंटरमध्येही एकूण 94 नवीन मृत्यूची नोंद झाली असून, एकूण मृत्यूची संख्या 2,009 वर गेली आहे. रविवारी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 2019 मधील याच महिन्याच्या तुलनेत, यावर्षी एप्रिलमध्ये मॉस्कोमध्ये 18 टक्के अधिक मृत्यूची नोंद झाली आहे, ज्यामुळे कोरोना व्हायरस रुग्णांच्या मृत्युमध्येही भर पडली. (हेही वाचा: यूएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कन्या इवांका ट्रम्प यांच्या खासगी स्वीय सहायकास कोविड 19 विषाणूची बाधा)
सरकारी अधिकारी, देशातील कमी मृत्यूची संख्या आणि वाढती रुग्णांची संख्या याचे श्रेय घेण्यात आलेल्या चाचण्यांना देतात. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रशियामध्ये जवळजवळ 56 लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामुळे डॉक्टरांना रुग्णांवर लवकर उपचार करणे शक्य झाले. मागच्या महिन्याच्या शेवटी रशियामध्ये 11 मे पर्यंतच्या लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली होती. आज पुतीन जनतेला लॉक डाऊनमध्ये शिथिलता आणण्याबाबत संबोधित करणार होते. याआधी रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशस्टीन यांनाही कोरोना विषाणूची लागण झाल्याची बातमी आली होती.