Al-Aqsa Mosque (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) आतापर्यंतचा सर्वात धोकादायक प्रकार असलेल्या ओमायक्रॉनचा (Omicron) प्रादुर्भाव जगभरातील देशांमध्ये वाढत आहे. प्रत्येक देश याबाबत उपाययोजना अंमलात आणत आहे, निर्बंध लादले गेले आहेत. अशात इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्ये असलेल्या अल-अक्सा मशिदीच्या (Al-Aqsa Mosque) इमामाने वादग्रस्त विधान केले आहे. सध्या त्यांचे हे वक्तव्य चर्चेत आहे व त्याबाबत टीकाही होत आहे. N12 नुसार, अल-अक्सा मशिदीचे इमाम इस्साम अमीरा म्हणाले आहेत की, ‘एलजीबीटीक्यू+ समुदाय, इस्रायली सरकार आणि मीडियामुळे ओमायक्रॉन वेगाने वाढत आहे.’

पॅलेस्टिनी इस्लामिक विद्वान आणि धर्मोपदेशक अमीरा यांनी जेरुसलेममधील मशिदीत (24 डिसेंबर 2021) शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर हे वादग्रस्त विधान केले. अमीरा म्हणाले की, ‘जर सरकार आणि मीडियाने लोकांना ओमायक्रॉन प्रकाराबद्दल माहिती दिली नसती तर त्याचा प्रसार झाला नसता. सरकार आणि प्रसारमाध्यमांनी आणलेले प्रकार हे समलैंगिकतेला प्रोत्साहन देत आहेत.’ सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये इमाम म्हणत आहेत की, हा व्हेरिएंट मीडिया आणि राज्यकर्त्यांमुळे पसरला आहे.

एवढेच नाही तर जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीमध्ये संबोधित करताना ते म्हणाले की, इस्रायलच्या मुस्लिम शासकांच्या चुकीच्या वर्तनामुळेच कोरोना विषाणू वेगवेगळ्या स्वरूपात पसरत आहे. हे राज्यकर्ते समलैंगिकतेला परवानगी देतात आणि स्त्रीवादी संघटनांचे पालन करतात, म्हणून कोरोना त्याच्या 'भारतीय प्रकार' आणि ओमायक्रॉन स्वरूपात जगभरात पसरला आहे. (हेही वाचा: इंग्लंडच्या Queen Elizabeth ला मारण्यासाठी Windsor Castle मध्ये घुसला तरुण; जालियनवाला हत्याकांडाचा बदला घेण्याची योजना)

इमामने वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, अमीराने कोविड प्रकार डेल्टाला भारतीय प्रकार म्हणून संबोधित केले होते. 2020 मध्ये प्रेषित मोहम्मदची छायाचित्रे वापरल्याबद्दल फ्रेंच शिक्षक सॅम्युअल पेटीची हत्या आणि शिरच्छेद करणाऱ्या मुस्लिमांचे कौतुक केल्याबद्दल इस्रायल पोलिसांनी अमीराला अटक केली होती आणि अल-अक्सा मशिदीवर सहा महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती.