Hajj Yatra (Photo Credits-Facebook)

सौदी अरेबियाने (Saudi Arabia) हज 2025 (Hajj 2025) साठी काही महत्त्वपूर्ण नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदलांमध्ये लहान मुलांना हज यात्रेत सहभागी होण्यास मनाई, व्हिसा धोरणांमध्ये कडकपणा, प्रथमच हज करणाऱ्यांना प्राधान्य, आणि नवीन पेमेंट प्रणालीचा समावेश आहे. हजच्या वेळी होणारी प्रचंड गर्दी आणि त्यातून उद्भवणाऱ्या सुरक्षेच्या धोक्यांमुळे, लहान मुलांना हज यात्रेत सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. हज ही एक इस्लामिक तीर्थयात्रा आहे. हा इस्लाम धर्मातील पाच स्तंभांपैकी एक महत्त्वपूर्ण स्तंभ आहे. प्रत्येक शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मुस्लिमाने आपल्या आयुष्यात किमान एकदा मक्केतील काबा या पवित्र स्थळाची यात्रा करावी, अशी इस्लाम धर्माची शिकवण आहे.

हज यात्रा दरवर्षी इस्लामी कॅलेंडरच्या बाराव्या महिन्यात, धू अल-हिज्जा महिन्यात, 8 ते 12 तारखेपर्यंत पार पडते. या महिन्यात जगभरातून मुस्लिम यात्रेकरू काबाला भेट देण्यासाठी मक्केत येतात. भारतामधूनही दरवर्षी अनेक मुस्लीम या यात्रेसाठी जातात. आता सौदी अरेबियाने यावेळी हजबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

व्हिसा धोरणांमध्ये बदल:

1 फेब्रुवारी 2025 पासून, भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया, इजिप्त आणि इतर 10 देशांतील नागरिकांना फक्त सिंगल-एंट्री व्हिसा दिला जाईल. या निर्णयामुळे अनधिकृत हज यात्रेकरूंना रोखण्याचा उद्देश आहे. (हेही वाचा: UK's Crackdown on Illegal Immigrant Workers: अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कारवाई; भारतीय रेस्टॉरंट्सला केले जात आहे लक्ष्य)

प्रथमच हज करणाऱ्यांना प्राधान्य:

2025 च्या हज यात्रेसाठी प्रथमच हज करणाऱ्या यात्रेकरूंना प्राधान्य दिले जाईल, ज्यामुळे अधिक मुस्लिमांना त्यांच्या आयुष्यात एकदा तरी हज करण्याची संधी मिळेल.

नवीन पेमेंट प्रणाली:

देशांतर्गत यात्रेकरूंसाठी हज पॅकेजेसची रक्कम तीन हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा देण्यात आली आहे: बुकिंगच्या 72 तासांच्या आत 20% आगाऊ रक्कम, त्यानंतर रमजान 20 आणि शव्वाल 20 पर्यंत प्रत्येकी 40% रक्कम. शेवटचा हप्ता मिळाल्यानंतरच बुकिंगची पुष्टी होईल.

या बदलांमुळे हज यात्रेची प्रक्रिया अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि सर्वसमावेशक होण्याची अपेक्षा आहे. सौदी अरेबिया हज आणि उमराह संबंधी आपले नियम सतत बदलत आहे. मागील वर्षी, ग्रेट ग्रँड मशिदीजवळ गर्दी जमल्यामुळे सौदी अरेबियाने उमराह दरम्यान लोकांना फोटोग्राफी टाळण्याचा सल्ला दिला होता.